मुंबई - भाजपविरोधात मुस्लीम समाज एकगट्ठा मतदान करुन ‘व्हाेट जिहाद’ पुकारत असल्याचा आरोप निवडणूक प्रचारात भाजपकडून सातत्याने करण्यात येत होता. मात्र मुस्लीम बहुल ३८ विधानसभा मतदारसंघात भाजप प्रणित महायुतीने तब्बल २१ जागा जिकंल्या असून भाजपचे ‘व्हाेट जिहादचे नॅरेटीव्ह पूर्णपणे असत्य होते हे सिद्ध झाले आहे, असा दावा समाजवादी पक्षाचे ‘भिवंडी पूर्व’चे आमदार रईस शेख यांनी केला आहे.
यासंदर्भात आमदार रईस शेख म्हणाले की, राज्यात मुस्लीम बहुल ३८ विधानसभा मतदारसंघ आहेत. ज्यांमध्ये मुस्लीमांचे २० ते ५२ टक्केपर्यंत लोकसंख्या आहे. अशा मतदारसंघात महायुतीने २१ जागा मोठ्या फरकाने जिंकल्या आहेत. जिंकणारे आमदार हिंदू आहेत. मुस्लीम समाजाचा ‘व्होट जिहाद’ असता तर असे चित्र दिसले नसते. महायुतीचे उमेदवार अगदी हजार पाचशेच्या फरकाने पुढेमागे असते. ‘व्होट जिहाद’च्या आडून मुस्लीम समाजाला बदनाम केले जात आहे.
आमदार शेख पुढे म्हणाले, मी मुस्लीम आमदारांमध्ये विक्रमी ५२ हजार मतांनी भिवंडी पूर्व मतदारसंघातून निवडून आलो आहे. भिवंडी मुस्लीम बहुल असूनही येथे मला हिंदु धर्मियांची १८ हजार मते मिळाली आहेत. त्यामुळे भाजपने निवडणुकीत दिलेले ‘बटेंगे तो कटेंगेर् आणि ‘एक है तो सेफ है’ चालले नाहीत. भाजपच्या विव्देषी घोषणांचा काहीएक परिणाम मतदारांवर झाला नाही. कागल, सिल्लोड या हिंदूबहुल मतदारसंघात हसन मुश्रिफ, अब्दुल सत्तार असे मुस्लिम उमेदवार निवडून आल्याचे आमदार रईस शेख यांनी अधोरेखीत केले.
विधानसभेला महायुतीने ६ आणि महाविकास आघाडीने ११ मुस्लीम उमेदवार दिले होते. राज्यात एकुण ४२० मुस्लीम उमेदवार विधानसभेच्या रिंगणात होते. पैकी १० मुस्लीम उमेदवार निवडून आले आहेत. त्यामध्ये काँग्रेस ३, समाजवादी २, अजित पवार राष्ट्रवादीचे २, शिंदे शिवसेनेचा १, उद्धव ठाकरे गटाचा १ आणि एमआयएमचा १ आमदार आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत १० मुस्लीम आमदार निवडून आले होते.
राज्यात ११.५६ टक्के मुस्लीम समाज असून विधानसभेत मुस्लीमांचे प्रतिनिधीत्व अवघे ३.४७ टक्के आहे. तर विधान परिषदेत १.२ टक्के मुस्लीम प्रतिनिधीत्व आहे. यावेळीसुद्धा भाजपने एकही मुस्लीम उमेदवार दिला नव्हता. ‘एमआयएम’चे इम्तियाज जलील वगळता २००४ नंतर राज्यात एकही मुस्लीम खासदार निवडून आलेला नाही.
महायुतीने जिंकलेले मुस्लीम बहुल मतदारसंघ -
१.भाजप : भिवंडी- पश्चिम, औरंगाबद- पश्चिम, अंधेरी- पश्चिम, अकोट, वांद्रे -पश्चिम, सोलापूर -मध्य, धुळे -शहर, नागपूर मध्य, सायन- कोळीवाडा, कारंजा, पुणे कॅन्टोनमेंट, रावेर, वाशिम, मलकापूर.
२. शिवसेना (एकनाथ शिंदे) : औरंगाबाद- पूर्व, कुर्ला, चांदीवली, नांदेड -उत्तर, नांदेड -दक्षिण, सिल्लोड
३. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) : अमरावती, कागल, अणुशक्तीनगर
No comments:
Post a Comment