मुंबईत क्षयरोग प्रतिबंधात्मक प्रौढ बीसीजी लसीकरण मोहिम - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

23 December 2024

मुंबईत क्षयरोग प्रतिबंधात्मक प्रौढ बीसीजी लसीकरण मोहिम


मुंबई - बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये बीसीजी ही लस क्षयरोग प्रतिबंधात्मक लस म्हणून वापरण्यास सुरूवात झाली आहे. प्रौढ बीसीजी लसीकरण मोहिमेच्या पहिल्या टप्प्याचा प्रारंभ आज (दिनांक २३ डिसेंबर २०२४) करण्यात आला. संपूर्ण बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये पहिल्या दिवशी  १ हजार ९९० नागरिकांचे लसीकरण करण्यात आले.

बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात क्षयरोग प्रतिबंधासाठी मुंबईतील सर्व नागरिकांना सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत उपलब्ध करून देण्यात येणाऱया आरोग्य सेवांचा लाभ मिळावा यादृष्टीने उपाययोजना करण्याचे निर्देश बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. भूषण गगराणी यांनी केले आहे. तसेच जवळच्या आरोग्य केंद्र व दवाखान्यात आणि आपल्या विभागात कार्यरत क्षयरोग कर्मचारी ह्यांना संपर्क साधावा, असे आवाहन अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा यांनी केले आहे. 

बीसीजी ऐच्छिक लसीकरण आहे, म्हणून पात्र लाभार्थ्यांकडून लेखी संमती घेतली जाते. त्याची अंमलबजावणी टप्प्याटप्प्याने करण्यात येणार आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात या लसीकरण मोहिमेसाठी सप्टेंबर २०२४ पासून आरोग्य स्वयंसेविका आणि आशासेविकांद्वारे पात्र लाभार्थ्यांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर मध्ये पात्र लाभार्थ्यांची यादी तयार करण्यात आली आहे. केंद्रीय क्षयरोग विभाग, आरोग्यस व कुटुंब कल्यारण मंत्रालय, भारत सरकारच्या धोरणानुसार सन २०२५ अखेर देशातून क्षयरोगाचे दुरीकरण करण्याचे ध्येय आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात त्यानुसार विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. वर्ष २०२३ मध्ये मुंबई महानगरात ५० हजार २०६ क्षय रुग्णांची नोंद झाली असून ते उपचाराधीन आहेत. 

क्षयरोगाचा प्रसार टाळण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात क्षयरोग प्रतिबंधासाठी २ नवीन उपक्रम सुरु करण्यात येत आहेत. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (ICMR) आणि राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रम यांच्याद्वारे मुंबईतील अतिजोखमीच्या गटातील लोकसंख्येसाठी प्रौढ बीसीजी लसीकरण कार्यक्रम हा राष्ट्रीय कार्यक्रमाअंतर्गत पथदर्शी प्रकल्प आहे. या प्रकल्पाची अंमलबजावणी मुंबईच्या १२ प्रशासकीय विभागांमध्ये करण्यात येत आहे. मुंबईत एकूण १२ नियंत्रण (कंट्रोल) विभाग आहेत. या मध्यस्थी (इंटरवेनशनल) विभागांमधील १८ वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील आणि ६ अतिजोखीम गटातील लाभार्थ्यांची निवड लसीकरणासाठी केली जाते. 

अतिजोखीम गट खालीलप्रमाणे -
१.  गेल्या ५ वर्षातील क्षयरोगाने बाधित रुग्ण 
२.  मागील ३ वर्षातील क्षयरोग रूग्णांचे घरगुती संपर्कातील व्यक्ती 
३.  स्वयंघोषित मधुमेही 
४.  स्वयंघोषित धूम्रपान करणारे 
५.  कुपोषित 
६.  वय ६० वर्षांपेक्षा जास्त.

Cy–TB चाचणी -
केंद्रीय क्षयरोग विभागामार्फत Programmatic Management of TB Preventive Therapy (PMTPT) अंतर्गत CY–TB ही Tuberculosis Antigen वर आधारीत त्वचेच्या थरामध्ये करण्यात येणारी चाचणी आहे. Tuberculin skin test (TST) सारखीच हीदेखील चाचणी आहे. चाचणी केल्यानंतर ४८ ते ७२ तासांमध्ये व्यक्तीने डॉक्टरकडे जाऊन त्याचे प्रमाण (reading) तपासणे आवश्यक असते.

 क्षय जंतूचे संसर्ग झालेले पण अद्याप लक्षणे नसलेल्या व्यक्तींचा शोध करण्यासाठी Cy-TB ही अत्यंत सोपी, माफक दरातील आणि प्रभावी तपासणी बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातही मोफत उपलब्ध झाली आहे. क्षयरोग रूग्णाच्या कुटुंबातील व्यक्तींना भविष्यात क्षयरोग होण्याची शक्यता तपासण्यासाठी ही चाचणी प्रामुख्याने सुरु करण्यात आली आहे.  जर चाचणी सकारात्मक आली तरच संपर्कातील व्यक्तींना टी.बी. प्रतिबंधात्मक औषधे घेण्याची आवश्यकता आहे.  

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad