नवी दिल्ली - देशातील जनतेच्या डोक्यावरील कर्जाचा भार दिवसेंदिवस वाढत असल्याचे समोर आले असून अहवालानुसार ग्रामीणसह शहरी भागातील जनता कर्जाच्या विळख्यात अडकली आहे. यामध्ये ग्रामीण भागातील प्रमाण शहरी भागापेक्षा जास्त आहे. केंद्रीय सांख्यिकी मंत्रालयाच्या व्यापक वार्षिक मॉड्यूलर सर्वेक्षणात दिलेल्या माहितीनुसार, १ लाख लोकांमागे १८ हजारांहून अधिक लोक कर्जबाजारी आहेत.
पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेने एक अहवाल सादर केला आहे. या अहवालामध्ये कर्जाच्या संदर्भातील माहिती दिली आहे. या अहवालात दिलेल्या माहितीनुसार, लोकांचे कर्ज घेण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. शहरी भागांतील लोक इएमआयवर वस्तू खरेदी करतात, असे मानले जाते. मात्र, ग्रामीण भागातील लोक देखील मोठ्या प्रमाणात इएमआयवर वस्तू खरेदी करताना दिसत आहेत. ग्रामीण भागात कर्जबाजारीपणाचं प्रमाण जास्त असल्याची माहिती अहवालात सांगण्यात आली आहे.
ईएमआयवर वस्तू खरेदीचे प्रमाण जास्त -
अहवालात दिलेल्या माहितीनुसार, १ लाख लोकांमागे १८ हजार ३२२ जण कर्जबाजारी झाले आहेत, अशी माहिती केंद्रीय सांख्यिकी मंत्रालयाच्या व्यापक वार्षिक मॉड्यूलर सर्वेक्षणात देण्यात आली आहे. शहरी भागातील प्रमाण १७.४४ टक्के आहे. तर ग्रामीण भागातील प्रमाण हे १८.७ टक्के आहे. ग्रामीण भागत कर्ज घेणा-यांचे प्रमाण हे ६ टक्क्यांनी वाढले आहे, तर शहरी भागात हेच प्रमाण २.८ टक्के एवढे आहे. यावरून ग्रामीण भागात इएमआयवर वस्तू खरेदीचे प्रमाण जास्त असल्याचे दिसून येत आहे.
बचत गटामुळे महिलांवरही कर्ज -
गेल्या १० वर्षामध्ये ग्रामीण भागात कुटुंबाचा खर्च १६४ टक्क्यांनी वाढला आहे, तर शहरी भागात कुटुंबाचा खर्च हा १४६ टक्क्यांनी वाढल्याची माहिती अहवालात देण्यात आली आहे. ग्रामीण भागात शेतक-यांवर मोठ्या प्रमाणात कर्ज आहे. याचे कारण म्हणजे वाढता उत्पादन खर्च आणि घटते उत्पादन हे आहे. तर महिलांवर बचत गटामुळे मोठ्या प्रमाणात कर्ज आहेत. शेतक-यांच्या शेतमाला योग्य बाजारभाव नसणे हे देखील कर्जबाजारी होण्याचे कारण आहे.
शहरी महिलांचे कर्जाचे प्रमाण कमी -
अहवालात दिलेल्या माहितीनुसार, ग्रामीण भागातील महिलांचे कर्ज गेण्याचे प्रमाण अधिक आहे. त्या तुलनेत शहरी भागातील महिलांचे कर्ज घेण्याचे प्रमाण कमी आहे. १ लाख महिलांमागे ग्रामीण भागत १३ टक्के महिला कर्ज घेतात, तर शहरामध्ये १ लाख महिलांमागे १० टक्केच महिला कर्ज घेतात. या आकडेवारीवरुन ग्रामीण भागात महिलाचे कर्ज घेण्याचे प्रमाण वाढत असल्याचे चित्र दिसत आहे.
No comments:
Post a Comment