मुंबई - मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या पिसे विद्युत उपकेंद्रात तांत्रिक बिघाड झाला आहे. हा बिघाड दुरुस्त करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. पिसे विद्युत उपकेंद्रात तांत्रिक बिघाडामुळे मुंबई, ठाणे, भिवंडीत १४ व १५ डिसेंबर पाणीपुरवठ्यात १५ टक्के कपात करण्यात आल्याची माहिती मुंबई महापालिका प्रशासनाने दिली आहे. (Water cut in mumbai)
पिसे विद्युत उपकेंद्रातील मुख्य ट्रान्सफॉर्मर क्रमांक १ च्या बी फेज करंट ट्रान्सफॉर्मरमध्ये शनिवार , दिनांक १४ डिसेंबर २०२४ रोजी रात्री १ वाजता अचानक बिघाड झाला. त्यामुळे पिसे उदंचन केंद्र येथील एकूण कार्यरत २० पंपांपैकी ६ उदंचन पंप बंद झाले आहेत. सदर दुरुस्तीचे काम युद्धस्तरावर हाती घेण्यात आले आहे. हे दुरुस्ती काम दिनांक १४ डिसेंबर २०२४ व १५ डिसेंबर २०२४ रोजी सुरु राहणार आहे.
या तातडीच्या दुरुस्ती कामामुळे शनिवार दिनांक १४ डिसेंबर २०२४ ते रविवार दिनांक १५ डिसेंबर २०२४ या कालावधीत मुंबई शहर आणि उपनगरांसह बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे ठाणे व भिवंडी महानगरपालिकेस होणाऱ्या पाणी पुरवठ्यात १५ टक्के कपात करण्यात येणार आहे. तरी सर्व नागरिकांना त्यांनी खबरदारीचा उपाय म्हणून नमूद कालावधीत पाणी काटकसरीने व जपून वापरुन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment