देशात फक्त अदानी व मोदी ‘एक हैं आणि सेफ हैं’ - राहुल गांधी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

18 November 2024

देशात फक्त अदानी व मोदी ‘एक हैं आणि सेफ हैं’ - राहुल गांधी


मुंबई - महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीची लढाई ही एक-दोन उद्योगपती व राज्यातील सर्वसामान्य जनता, शेतकरी, महिला व तरुण यांच्यातील आहे. पंतप्रधान मोदींचा मुंबई व महाराष्ट्राच्या संपत्तीवर डोळा असून ती लुटण्याचे काम सुरु आहे. धारावीची एक लाख कोटी रुपये किंमतीची जमीन एका व्यक्तीला देण्यासाठी सर्व सरकारी यंत्रणा कामाला लागलेली असून मोदींची घोषणा ‘एक हैं तो सेफ हैं’ (Ek hai to safe hai) म्हणजे फक्त अदानी व मोदी ‘एक हैं आणि सेफ ही हैं’ असा जोरदार प्रहार लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केला. यावेळी राहुल गांधींनी पत्रकार परिषदेत एक बंद तिजोरी (सेफ) सादर करून पत्रकारांसमोर ती उघडली. त्यात मोदी आणि अंबानींचा फोटो आणि धारावीचा नकाशा ठेवण्यात आला होता. अदानी-मोदी देश लुटण्यासाठी ‘एक है तो सेफ है’ असा आरोप ही तिजोरी दाखवत राहुल गांधी यानी केला. (Political News)(Mumbai News) 

मुंबईतील हॉटेल सोफीटेलमधील भरगच्च पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी विधानसभा निवणुकीतील मुद्द्यांवर पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी राहुल गांधी म्हणाले की, मुंबईतील धारावी ही लघु व मध्यम उद्योगाचे हब आहे. हे हब बंद करुन धारावी अदानीच्या घशात घालण्यासाठी सर्व सरकारी यंत्रणा कामाला लागली आहे. हा फक्त धारावीच्या जमिनीपुरताच मुद्दा नसून मुंबई, मुंबईचे पर्यावरण यांच्याशीही संबंधीत आहे. देशातील सर्व विमानतळ, संरक्षण साहित्य बनवण्याचे काम, बंदरे, उर्जा निर्मीती प्रकल्प सर्वकाही एकाच व्यक्तीच्या हातात देण्यासाठी भाजपा सरकार काम करत आहे. भाजपाची नजर मुंबई व महाराष्ट्राच्या संपत्तीवर असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठिंब्याशिवाय हे होणे शक्य नाही, असा हल्लाबोल करत महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर धारावीकरांच्या इच्छा अपेक्षानुसार त्यांचे हित जोपासत हा प्रकल्प राबविला जाईल, असे राहुल गांधी म्हणाले.
  
निवडणुकीत महागाई व बेरोजगारी हे दोन मुख्य मुद्दे आहेत पण त्याकडे भाजपा सरकार वा पंतप्रधान नरेंद्र मोदी लक्ष देत नाहीत. महाराष्ट्रातील शेतकरी संकटात आहे, सोयाबीन, कापूस, कांदा यासह शेतमालाला भाव नाही तर बेरोजगारीमध्ये प्रचंड वाढ झालेली आहे. परंतु भाजपा सरकार नोकर भरती करत नाही. उलट महाराष्ट्रात येणारे वेदांता फॉक्सकॉन, टाटा एअर बस, बल्क ड्रग प्रकल्प, आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र यासारखे तब्बल ७ लाख कोटी रुपयांची गुंतवणुकीचे प्रकल्प राज्याबाहेर गेले. त्याबरोबरच इथल्या युवकांचे ५ लाख रोजगार महाराष्ट्रातून गुजरातसह इतर राज्यात गेले असल्याचे राहुल गांधी यांनी सांगितले.

मविआची सत्ता आल्यानंतर शेतकऱ्यांचे ३ लाखांचे कर्ज माफ करणार, सोयाबीनला ७ हजार रुपये प्रति क्विंटल भाव, कांदा, कापसाला योग्य हमी भाव, महिलांना दर महिन्याला ३ हजार रुपये व मोफत बस प्रवासाची सुविधा, राजस्थानच्या धर्तीवर २५ लाखांचा आरोग्य विमा दिला जाईल. बेरोजगारांना महिना ४ हजारांचा भत्ता तसेच २.५ लाख रिक्त सरकारी जागांची भरती केली जाईल. जातनिहाय जनगणना करणे व ५० टक्क्यांची आरक्षण मर्यादा हटवणे यावर भर दिला जाईल असेही राहुल गांधी यांनी सांगितले.
 
पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना राहुल गांधी म्हणाले की, काँग्रेसच्या ५ गॅरंटी व मविआच्या जाहिरनाम्यातील पुर्तता करण्यात कोणतीही आर्थिक अडचण येणार नाही. कर्नाटक, हिमाचल प्रदेश, तेलंगणामध्ये काँग्रेसने अशाच गॅरंटी दिल्या होत्या त्याची यशस्वी अंमलबजाणी सुरु आहे असे राहुल गांधी यांनी सांगितले.

या पत्रकार परिषदेला अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल, महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नीथला, राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत, उत्तर प्रदेशचे प्रभारी अविनाश पांडे, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या मीडिया व पब्लिसिटी विभागाचे अध्यक्ष पवन खेरा, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा खा. वर्षा गायकवाड, काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य व प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, राष्ट्रीय सचिव यु. बी. व्यंकटेश आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad