दहावी, बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

25 November 2024

दहावी, बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर


मुंबई - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता बारावी) व माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इयत्ता दहावी) लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा फेब्रुवारी – मार्च २०२५ मध्ये घेण्यात येणार आहेत. या परीक्षांचे वेळापत्रक मंडळामार्फत www.mahahsscboard.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती मंडळाचे सचिव देविदास कुलाल यांनी दिल्याचे मुंबई विभागीय सचिव ज्योत्स्ना शिंदे – पवार यांनी कळविले आहे. (Schedule of 10th and 12th exams announced)

उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (सर्वसाधारण, द्विलक्षी व व्यवसाय अभ्यासक्रम तसेच माहिती तंत्रज्ञान व सामान्य ज्ञान विषयांची ऑनलाइन परीक्षा) दि. ११ फेब्रुवारी ते दि. १८ मार्च २०२५ या कालावधीमध्ये घेण्यात येतील. तर, प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन तसेच एनएसक्यूएफ अंतर्गत व्यावसायिक अभ्यासक्रम प्रात्यक्षिक परीक्षा दि. २४ जानेवारी ते दि. १० फेब्रुवारी २०२५ या कालावधीमध्ये घेण्यात येतील.

माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (इ. १० वी) दि. २१ फेब्रुवारी ते दि. १७ मार्च २०२५ या कालावधीमध्ये घेण्यात येतील. तर, प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा दि. ३ फेब्रुवारी ते दि. २० फेब्रुवारी २०२५ या कालावधीत घेण्यात येणार आहेत.

पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत या परीक्षा आयोजित करण्यात येणार आहेत. मंडळाच्या संकेतस्थळावरील वेळापत्रकांची सुविधा ही फक्त माहितीसाठी आहे. परीक्षेपूर्वी माध्यमिक शाळा/ उच्च माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालय यांच्याकडे छापील स्वरूपात देण्यात येणारे वेळापत्रक अंतिम असेल. त्या छापील वेळापत्रकावरूनच परीक्षेच्या तारखांची खात्री करून घ्यावी आणि विद्यार्थ्यांनी परीक्षेस प्रविष्ट व्हावे. अन्य संकेतस्थळावरील किंवा अन्य यंत्रणेने छपाई केलेले तसेच व्हाट्सॲप किंवा तत्सम माध्यमातून प्रसारित झालेले वेळापत्रक ग्राह्य धरु नये, असेही राज्य मंडळामार्फत स्पष्ट करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad