मुंबई - महायुती सरकारने मागील दोन वर्षात समाजातील प्रत्येक घटकासाठी योजना आणल्या, मात्र या योजना रोखण्यासाठी महाविकास आघाडी कोर्टात गेली, अशी सडकून टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी केली. या राज्यातील कॉमनमॅनला सुपरमॅन करायचंय असून आम्ही जे बोलतो ते करून दाखवतो, असे ते म्हणाले. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्री यांनी विरोधकांचा समाचार घेतला. (Political News) (Mumbai News)
ते पुढे म्हणाले की, लोकसभा निवडणुकीवेळी विरोधकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महायुतीची दहशत अल्पसंख्याक आणि दलित समाजात निर्माण केली. मात्र विधानसभेची निवडणूक स्थानिक मुद्द्यांची आहे. सारखंसारखं फेक नरेटिव्ह करता येत नाही, मतदार सूज्ञ आहेत, आता ते पुन्हा चूक करणार नाहीत. महायुतीने कल्याणकारी योजना राबवल्या, याआधीचे सरकार फक्त ‘मेरी आवाज सुनो’ प्रमाणे वागत होते, अशी टीका मुख्यमंत्र्यांनी केली.
आमचं सरकार देणारं आहे, घेणारं नाही. लाडकी बहीण योजना लोकप्रिय झाली. लाडकी बहीण योजना बंद होऊ देणार नाही. निवडणूक झाल्यावर डिसेंबरचे पैसे देणार असे ते म्हणाले. आमची देण्याची नियत, नीती, उद्देश स्वच्छ आहेत. देशात आणि महाराष्ट्रात विकास कामे जोरात सुरु आहेत. राज्याचा विकास म्हणजे देशाचा विकास असे ते म्हणाले. वर्षा जनतेसाठी खुले केले. मनुष्य सेवा हीच ईश्वर सेवा या मताने आपण काम करतो. मागील दोन वर्षात ३५० कोटी वैद्यकीय मदत दिली. समृद्धी महामार्गामुळे १० जिल्हे थेट जोडले गेले. सरकारने केलेल्या कामांचे रिपोर्टकार्ड सादर करण्याचे धाडस केले. फक्त विकासच नाही तर राज्यात उद्योग आणले, रोजगार वाढले. गडचिरोलीत स्टील उद्योग आले, टाटा समूहाने कौशल्य विकासाचे काम सुरु केले असे मुख्यमंत्री म्हणाले. कौशल्य विकासात, स्टार्टअप्समध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे.
मुंबईमध्ये झोपडपट्टी, धोकादायक इमारती, बी.डी.डी चाळी यांच्या पुनर्विकासाचे काम सुरु आहे. इथ २५ वर्ष काहीच झाले नाही. यातील भाडेकरु मुंबईबाहेर फेकले गेले. सरकारने म्हाडा, एसआरए, सिडको, एमएमआरडीए, बीएमसी, महाप्रीत यासारख्या संस्थांना एकत्र करुन पुनर्विकासावर वेगाने काम सुरु आहे. झोपडपट्टीवासियांना घरे द्या बाळासाहेबांचे स्वप्न होते ते आम्ही पूर्ण करतोय. यासाठी कायद्यात बदल करतो, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. जनतेचे पैसे आहेत ते जनतेलाच गेले पाहिजे. कोणाची जहागिरदारी नाही, अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी यावेळी मांडली. आपल्यासोबत आलेले ५० आमदार एकसंधपणे पाठिशी उभे राहिले. त्यांच्या मतदार संघात विकास कामांना निधी मिळाला. याआधी विकास कामांसाठी भीक मागावी लागत होती, असे ते म्हणाले.
धारावीबाबतचा करार महाविकास आघाडी सरकारने केला मग तो पूर्ण का केले नाही. का तुमची बोलणी फिस्कटली असा सवाल त्यांनी केला. आता केवळ अदानी समूहाला विरोध करण्यासाठी काहीजण राजकारण करत आहेत, अशी टीका मुख्यमंत्र्यांनी केली. धारावीतील २ लाख लोकांना घरे देणार आहोत. प्रत्येकी १ कोटी प्रमाणे धारावीत २ लाख कोटींची घरे दिली जाणार आहेत. केवळ बदमान करण्यासाठी विरोधक धारावी प्रकल्पाला विरोध करत आहेत, अशी टीका मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. महायुतीचे जागावाटप समन्वयाने झाले आहे. शिवसेनेला जवळपास ८० जागा मिळाल्या आहेत. कोणाला किती जागा मिळाल्या यापेक्षा महायुतीच्या जास्तीत जागा निवडून येतील यावर आम्ही तिन्ही पक्ष एकत्र काम करत आहोत. राज्यात महायुती बहुमताने सत्तेवर येईल, असा विश्वास मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला.
ليست هناك تعليقات:
إرسال تعليق