स्वच्छता कर्मचारी वसाहतींना पालिका आयुक्तांची सपत्नीक भेट - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

01 November 2024

स्वच्छता कर्मचारी वसाहतींना पालिका आयुक्तांची सपत्नीक भेट



मुंबई - बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जी उत्तर विभागातील कासारवाडी (दादर) परिसरातील स्वच्छता कामगारांच्या वसाहतीला बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी सपत्नीक आज सदिच्छा भेट दिली. यावेळी आयुक्तांनी मुंबईच्या दैनंंदिन स्वच्छतेत मोलाचे योगदान देणाऱ्या स्वच्छता कर्मचारी वर्गाला आणि त्यांच्या कुटुंबीयांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या. तसेच कर्मचाऱ्यांसोबत गगराणी यांनी दिवाळीचा फराळही केला. कासारवाडी परिसरातील स्वच्छता आणि सोयीसुविधांबाबत आयुक्तांनी समाधान व्यक्त केले.

कासारवाडी (दादर) परिसरातील स्वच्छता कामगारांसाठी आजची सकाळ एका विशेष भेटीमुळे आनंदाची आणि उत्साहाची ठरली. स्वच्छता कर्मचाऱ्यांची तिसरी - चौथी पिढी कासारवाडीत वास्तव्यास आहे. स्वच्छता कामगारांच्या वसाहतीला दीपावली उत्सवात गगराणी यांच्या रूपाने भेटीसाठी पहिल्यांदाच महानगरपालिका आयुक्त आल्याने कर्मचाऱ्यांच्या आनंदाला पारावार उरला नव्हता. याप्रसंगी जी उत्तर विभागाचे सहायक आयुक्त अजितकुमार आंबी तसेच घनकचरा व्यवस्थापन विभागाचे अभियंता आणि कर्मचारी वर्गदेखील उपस्थित होता.

महानगरपालिका आयुक्त गगराणी यांनी कासारवाडी स्वच्छता कामगारांच्या वसाहतीत मनसोक्त फेरफटका मारला. वसाहतीतील स्वच्छतागृहांची व्यवस्था आणि स्वच्छता आदींची त्यांनी स्वतः भेट देऊन पाहणी केली. तसेच स्वच्छतागृहांच्या ठिकाणी स्वच्छतेच्या काय उपाययोजना आहेत, त्याची रहिवाशांकडे विचारपूसही केली. संपूर्ण वसाहत परिसरात ठेवण्यात येणाऱ्या स्वच्छतेबाबत गगराणी यांनी समाधान व्यक्त केले. परिसर स्वच्छतेसाठी पुरविण्यात येणार्‍या साहित्यांच्या, उपकरणांचा पुरवठा आणि व्यवस्थेबाबतही त्यांनी कामगारांसोबत संवाद साधला.

जी उत्तर विभागात माहीम दर्गा येथे चौकीसाठी काम करणाऱ्या रिद्दी गोहील आणि त्यांच्या कुटुंबीयांनी गगराणी दाम्पत्याला दीपावली निमित्ताने तयार केलेला फराळ आणि चहा दिला. आमच्या अनेक पिढ्या या वसाहतीत राहिल्यात. महानगरपालिकेने परिसरात या वसाहतींसाठी केलेली व्यवस्था आणि स्वच्छतेची घेतलेली काळजी ही अतिशय कौतुकास्पद असल्याची प्रतिक्रिया गोहील कुटुंबीयांनी दिली. स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या वसाहतीला सपत्नीक भेट देणारे हे गगराणी हे पहिलेच आयुक्त असल्याचेही गोहील कुटुंबीयांनी यावेळी विशेषपणे नमूद केले.

कासारवाडी वसाहतीच्या भेटीनंतर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या टी विभागात मुलुंड पश्चिम येथे राजेंद्र प्रसाद मार्ग स्वच्छता कर्मचारी वसाहतीला आयुक्त भूषण गगराणी यांनी सपत्नीक सदिच्छा भेट दिली. यावेळी मोठ्या प्रमाणावर कर्मचारी वर्ग आणि त्यांचे कुटुंबिय उपस्थित होते. महानगरपालिका आयुक्तांनी दीपावलीनिमित्त सर्व कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना. शुभेच्छा दिल्या. याठिकाणी स्वच्छता कर्मचारी वसाहतीच्या पुनर्विकासाबाबत त्यांनी माहिती घेतली. तसेच परिसर स्वच्छतेबाबतही आढावा घेतला.

स्वच्छता कर्मचारी वर्गाच्या कुटुंबीयांनी आयुक्तांचे स्वागत औक्षण करून केले. तसेच आयुक्त गगराणी यांनी गृहभेटी घेतकर्मचाऱ्यांच्या घरी फराळाचा आस्वादही घेतला. याप्रसंगी टी विभागाचे सहायक आयुक्त अजय पाटणे तसेच घनकचरा व्यवस्थापन विभागाचे अभियंता आणि कर्मचारी वर्गदेखील उपस्थित होता.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad