मुंबई - कायदेशीर प्रस्तावांची तपासणी करण्याची प्रक्रिया, विधेयक व अध्यादेशाचा मसुदा तयार करणे तसेच दुय्यम विधी विधान तयार करणे याबाबतची माहिती राज्यात कायद्याचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना व्हावी, यासाठी विधी विधान इंटर्नशिप उपक्रम 20 जानेवारी ते 28 फेब्रुवारी 2025 या कालावधीत राबविण्यात येणार आहे. या उपक्रमाद्वारे शासनाच्या कामकाजाची माहिती, विधेयके, अध्यादेश, नियम, अधिसूचनांचे प्रारूप तयार करण्याबाबतची कार्यपद्धती, विधान मंडळात विधेयके पारित करण्याची कार्यपद्धती, विधी व न्याय विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संवाद, संविधानातील कायदेविषयक तरतुदी व त्यांचा प्रत्यक्ष वापर, विविध कायदे व तरतुदींची माहिती, विधी व न्याय विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत कामाचा प्रत्यक्ष अनुभव, विविध विषयांवर व्याख्याने तसेच संबंधित कार्यालयाना भेटी देण्याची रूपरेषा ठरविण्यात आली आहे. (Internships for law students)
महाराष्ट्रातील विधी महाविद्यालये व विद्यापीठे यामधील 5 वर्षाच्या विधी पदवी अभ्यासक्रमाचे चौथ्या किंवा पाचव्या वर्षात शिकत असलेले विद्यार्थी, 3 वर्षाच्या विधी पदवी अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या वर्षात शिकत असलेले विद्यार्थी तसेच विधी पदव्युत्तर पदवीचे पहिल्या किंवा दुसऱ्या वर्षात शिकत असलेले विद्यार्थी या विधी विधान इंटर्नशिपसाठी पात्र आहेत. तथापि, या उपक्रमासाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्याचे वय 28 वर्षापेक्षा जास्त नसावे, असेही स्पष्ट करण्यात येत आहे.
पात्र विद्यार्थ्यांनी या उपक्रमासाठीचे ऑनलाईन अर्ज व संबंधित कागदपत्रे एआयसीटीइ (AICTE) च्या http://internship.aicte-india.org या पोर्टलवर 15 डिसेंबर 2024 पर्यंत अपलोड करावेत. कागदपत्रांमध्ये एमएच सीईटी लॉ / सीएलटी (CLAT) गुणपत्रिका, एचएससी गुणपत्रिका तसेच शेवटच्या उत्तीर्ण परीक्षेची गुणपत्रिका अपलोड करणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे, 15 डिसेंबर 2024 नंतर प्राप्त होणाऱ्या अर्जाचा विचार केला जाणार नसून अपूर्ण माहिती असलेले अर्ज ग्राह्य धरण्यात येणार नाहीत.
या इंटर्नशिप बॅच 3 करिता 12 विद्यार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे. यात 5 वर्षाच्या विधी पदवी अभ्यासक्रमाचे 3 विद्यार्थी व 3 विद्यार्थिनी, 3 वर्षाच्या विधी पदवी अभ्यासक्रमाचे 2 विद्यार्थी व 2 विद्यार्थिनी तसेच विधी पदव्युत्तर व पदवी अभ्यासक्रमाचा 1 विद्यार्थी व 1 विद्यार्थिनीची निवड करण्यात येईल. या इंटर्नशिपचे ठिकाणी विधी विधान शाखा, विधी व न्याय विभाग, पाचवा मजला, मंत्रालय, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मुंबई हे असेल.
हे विधी विधान इंटर्नशिप यशस्विरित्या पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना रूपये 10 हजार इतके विद्यावेतन देण्यात येणार असून कार्यअहवाल सादर केल्यानंतर त्यांना इंटर्नशिप प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
No comments:
Post a Comment