High Alert - राज्यातील सर्व रेल्वे स्थानकांना हायअलर्ट - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

11 November 2024

High Alert - राज्यातील सर्व रेल्वे स्थानकांना हायअलर्ट


नागपूर / मुंबई - ठिकठिकाणची रेल्वे स्थानके आणि रेल्वे गाड्यांमध्ये प्रवाशांची गर्दी ओसंडून वाहत असतानाच वारंवार स्फोट घडविण्याची धमकी मिळत असल्याने रेल्वे प्रशासन पुरते बेजार झाले आहे. दरम्यान, शनिवारी रात्री पुन्हा असाच हायअलर्ट मिळाल्यामुळे नागपूरसह विविध राज्यातील मोठ्या रेल्वे स्थानकांवर सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे. (High alert to railway stations)

जैश-ए-मोहम्मदने या पाकिस्तानी दहशतवादी संघटनेने ऑक्टोबरच्या दुस-या आठवड्यात विविध प्रांतातील रेल्वे गाड्यांमध्ये स्फोट घडविण्याची धमकी दिली होती. त्यानंतर रेल्वे गाड्या, ठिकठिकाणच्या रेल्वे स्थानकावर, परिसरात सशस्त्र जवानांचा बंदोबस्त वाढविण्यात आला. बॉम्ब शोधक आणि नाशक पथक (बीडीडीएस), डॉग स्कॉडकडून वारंवार गाड्यांची तपासणी केली जाऊ लागली. हे सर्व सुरू असताना रेल्वे गाड्यांमध्ये, स्थानकांवर स्फोट घडवून आणण्याचे धमकीसत्रच सुरू झाले. १४ ऑक्टोबरला राजस्थानच्या हनुमानगडमध्ये आणि २८ ऑक्टोबरला नागपूर स्थानकावर स्फोट करण्याची धमकी मिळाली.

१ नोव्हेंबरला दरभंगा येथून दिल्लीकडे निघालेल्या बिहार संपर्क क्रांती एक्सप्रेसमध्ये बॉम्ब असल्याची सूचना मिळाली. ८ नोव्हेंबरला अलीगड रेल्वे स्थानक बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाली. या सर्व धमक्यांमुळे रेल्वे प्रशासनात प्रचंड खळबळ निर्माण झालेली असताना आता ९ नोव्हेंबरला पुन्हा अलर्ट मिळाल्याने रेल्वे प्रशासनासोबतच सुरक्षेची जबाबदारी सांभाळणा-या रेल्वे सुरक्षा दल (आरपीएफ) आणि रेल्वे पोलिसांचीही (जीआरपी) तारांबळ उडाली आहे.

मोठा सशस्त्र बंदोबस्त -
शनिवारी रात्री उशिरा रेल्वे पोलिस महासंचालकांकडून रेल्वे पोलिसांना अलर्ट मिळाला. त्यानुसार, नागपूरसह राज्यातील ठिकठिकाणच्या रेल्वे स्थानकांवर हायअलर्टची स्थिती निर्माण झाली. डे-नाईट असे प्रत्येकी ४५ सशस्त्र अधिकारी-कर्मचा-यांना आणि बॉम्ब शोधक तसेच नाशक पथकाला सुरक्षेसाठी रेल्वे स्थानक आणि परिसरात तैनात करण्यात आले. तेवढेच मणूष्यबळ रेल्वे सुरक्षा दलाकडूनही तैनात करण्यात आले. रेल्वे गाड्या आणि स्थानकाच्या कानाकोप-यातील स्थितीचा आम्ही वारंवार आढावा घेत असल्याचे वरिष्ठ अधिका-यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad