मुंबई - बृहन्मुंबई महापालिका वार्ताहर संघाचे सल्लागार आणि ज्येष्ठ पत्रकार नितीन चव्हाण यांचे दीर्घकालीन आजाराने १ ऑक्टोबर रोजी दुःखद निधन झाले. बृहन्मुंबई महापालिका वार्ताहर संघातर्फे सोमवारी महापालिका वार्ताहर कक्षात आयोजित शोकसभेत दिवंगत नितीन चव्हाण यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करण्यात आली. यावेळी, नितीन चव्हाण यांच्या पत्नी पुजा चव्हाण, मुलगा ऋृषी आणि मुलगी वैष्णवी आदी उपस्थित होते.
दिवंगत नितीन चव्हाण हे धडाडीचे पत्रकार होते. त्यांनी वृत्तपत्र लेखनातून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यांनी दै. मुंबई तरुण भारत, दै. सकाळ, दै. सामना आणि दै. महाराष्ट्र टाइम्स या वृत्तपत्रांमधून गेली २७ वर्षे पत्रकारिता केली. त्यापैकी १५ वर्षे त्यांनी मुंबई महापालिका कामकाजाचे वृत्तसंकलन केले.
बृहन्मुंबई महानगर पालिका वार्ताहर संघाच्यावतीने पालिका मुख्यालयातील पत्रकार कक्षात सोमवारी आयोजित शोकसभेत, महापालिका वार्ताहर संघाचे अध्यक्ष मारुती मोरे, सरचिटणीस राजेश सावंत, सल्लागार आणि माजी अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार विष्णू सोनवणे, ज्येष्ठ पत्रकार सुनील शिंदे, दै. महाराष्ट्र टाइम्सचे ज्येष्ठ पत्रकार समीर कर्वे आदींनी नितीन चव्हाण यांच्या आठवणींना उजाळा देत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित केली.
भाजपचे माजी नगरसेवक भालचंद्र शिरसाट, मुंबई महापालिका उप जनसंपर्क अधिकारी गणेश पुराणिक, कामगार नेते कामगार नेते संजय कांबळे - बापेरकर यांनीही नितीन चव्हाण यांना श्रद्धांजली वाहत आठवणींना उजाळा दिला. या शोकसभेला बृहन्मुंबई महानगर पालिका वार्ताहर संघाचे पदाधिकारी, सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते.
No comments:
Post a Comment