मुंबई - बृहन्मुंबई महानगरपालिका अधिकारी - कर्मचा-यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा करण्याच्या उद्देशाने स्थापन झालेल्या 'दि म्युनिसिपल को-ऑपरेटिव्ह बँके'स लखनऊ येथील 'बॅंकींग फ्रंटिअर्स' या नामांकित संस्थेने विविध तीन वर्गवारीत पुरस्कार देवून गौरविले आहे. बेस्ट ऑडिट इनिशिएटिव्ह, बेस्ट सायबर सिक्युरिटी इनिशिएटिव्ह व बेस्ट एच.आर. इनोव्हेशन या तीन वर्गवारीत पुरस्कार पटकावित दि म्युनिसिपल को-ऑपरेटिव्ह बँकेने आपल्या शिरपेचात आणखी एक तुरा खोवला आहे.
'बँकींग फ्रंटिअर्स' या संस्थेतर्फे लखनऊ (उत्तर प्रदेश) येथे सहकारी बँक क्षेत्रातील पुरस्कारांचे नुकतेच वितरण करण्यात आले. दि म्युनिसिपल को-ऑपरेटिव्ह बँकेचे महाव्यवस्थापक विनोद रावदका यांनी या समारंभात हे पुरस्कार स्वीकारले.
दि म्युनिसिपल को-ऑपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष तथा महानगरपालिका आयुक्त, प्रशासक भूषण गगराणी, उपाध्यक्ष तथा अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनानुसार बँकेने मोठ्या प्रमाणात कामकाजाचा विस्तार केला आहे. बँकेचे कार्याध्यक्ष तथा महानगरपालिका सहआयुक्त (परिमंडळ ४) विश्वास शंकरवार, उप कार्याध्यक्ष तथा उप आयुक्त देविदास क्षीरसागर आणि संचालक मंडळाच्या उत्तम व्यवस्थापन, नियोजन यामुळे बँकेच्या आर्थिक प्रगतीचा आलेख उंचावत आहे.
दि म्युनिसिपल को-ऑपरेटिव्ह बँकेस या वर्षी सहकार क्षेत्रातील विविध तीन नामांकित संस्थाकडून पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले आहे. त्यात प्रामुख्याने दि महाराष्ट्र अर्बन कॉ-ऑपरेटिव्ह बॅंक्स् फेडरेशन लिमिटेड या संस्थेमार्फत सन २०२३ - २४ करीता सर्वोत्कृष्ट बँक, दि बृहन्मुंबई नागरी सहकारी बँक असोसिएशन या संस्थेमार्फत पगारदार सहकारी बँक श्रेणीमध्ये प्रथम पुरस्कार आदींचा देखील समावेश आहे.
दिनांक ३१ मार्च २०२४ अखेरीस महानगरपालिकेच्या ७१ हजार १३ अधिकारी - कर्मचा-यांनी दि म्युनिसिपल को-ऑपरेटिव्ह बँकेचे सभासदत्व स्वीकारले आहे. कोअर बँकींग, आर.टी.जी.एस., एन.ई.एफ.टी., ई-कॉमर्स, पॉस इत्यादी सुविधा देणा-या दि म्युनिसिपल को-ऑपरेटिव्ह बँकेची मुंबई शहर व उपनगरात विविध ठिकाणी स्वमालकीची १० ए.टी.एम. केंद्र आहेत. बँकेने मोबाईल बँकींग सुवा सुरू केली असून अद्ययावत तंत्रज्ञानाद्वारे ग्राहकांना सुविधा पुरविली जात असल्याचे बँकेचे महाव्यवस्थापक विनोद रावदका यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment