रोहिंग्या आणि बांग्लादेशी घुसखोरांना मुंबईबाहेर काढणाऱ्या स्वच्छता अभियानाची गरज - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

03 October 2024

रोहिंग्या आणि बांग्लादेशी घुसखोरांना मुंबईबाहेर काढणाऱ्या स्वच्छता अभियानाची गरज


मुंबई - केंद्रीय राज्यमंत्री जयंत चौधरी यांच्या हस्ते आज कौशल्य विकास विभागाच्या विविध उपक्रमांचा शुभारंभ झाला. या कार्यक्रमात एल्फिन्स्टन तांत्रिक विद्यालय येथील आयटीआयचे नामकरण भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मुंबई असे करण्यात आले. त्याचप्रमाणे मान्यवरांच्या हस्ते गोरेगाव, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजी नगर, अमरावती व नागपूर येथील संत गाडगेबाबा स्वच्छ भारत प्रबोधिनीचा शुभारंभ करण्यात आला.

कार्यक्रमात बोलताना केंद्रीय राज्यमंत्री चौधरी म्हणाले की, "आजचा क्षण ऐतिहासिक आहे, कारण आपल्या सर्वांचे आदरस्थान असलेले भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या वास्तूत शिक्षण घेतले, त्या वास्तूला त्यांचेच नाव देण्याचा समारंभ आणि ज्या व्यक्तीने आयुष्यभर स्वच्छतेचे महत्व पटवून दिले त्या संत गाडगेबाबा महाराज यांच्या नावाने सहा ॲकडमी सुरू करण्यात आल्या आहेत. ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. या दोन्ही महापुरूषांचे विचार आपल्या युवा पिढीने आत्मसात करून आपल्या देशाला तिसरी आर्थिक महासत्ता बनण्यासाठी, कौशल्यपूर्ण विकास करण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. महाराष्ट्र सरकारने कौशल्य विकासासाठी महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून युवकांच्या विकासासाठी कौशल्य विद्यापीठ स्थापन केले असून हे देशातील एकमेव कौशल्य विद्यापीठ आहे, ज्यामध्ये कौशल्ययुक्त शिक्षण देऊन प्रत्यक्ष रोजगार देण्यावर भर दिला जात आहे. ही अत्यंत अभिमानाची बाब असून, राज्याच्या कौशल्य विकास विभागाने नाविन्यपूर्ण उपक्रमाद्वारे देशात आपली वेगळी ओळख निर्माण केली असून हे कौतुकास्पद आहे."

प्रसार माध्यमांशी संवाद साधताना मंत्री लोढा म्हणाले, “भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने शासकीय औद्योगिक संस्थांचे नामकरण करणे ही केवळ सन्मानाची गोष्ट नाही, तर त्यांचा आदर्श घेऊन आम्ही हजारो तरुणांना स्वावलंबी बनवण्याचे काम करत आहोत. त्यासोबतच आज संत गाडगे बाबांच्या नावाने आम्ही स्वच्छ भारत प्रबोधिनीची सुरुवात केली आहे. त्याकाळी स्वच्छतेचे महत्व पटवून देण्यासाठी संत गाडगे बाबांनी हातात झाडू घेतला आणि स्वच्छता अभियान सुरू केले. ज्याप्रमाणे संत गाडगे बाबांनी त्याकाळी महाराष्ट्रातला कचरा बाहेर काढला, त्याचप्रमाणे आज मुंबईमध्ये घुसलेले रोहिंग्या आणि बांग्लादेशी घुसखोर बाहेर काढायला हवेत.”

कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून भारतात प्रथमच ठाण्यात संत गाडगे बाबा स्वच्छ भारत प्रबोधिनीची सुरुवात झाली. या प्रबोधिनीला मिळालेला प्रतिसाद लक्षात घेऊन आता गोरेगाव, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, अमरावती व नागपूर येथे देखील सदर प्रबोधिनी सुरू होत आहेत. ठाणे येथे या प्रबोधिनीच्या प्राथमिक बॅचेस पूर्ण झाल्या असून, आता भारत विकास ग्रुपच्या माध्यमातून येथील विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी देखील उपलब्ध झालेल्या आहेत.

नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये राज्यातील १४ शासकीय औद्योगिक संस्थांचे नामकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्या अनुषंगाने एल्फिन्स्टन तांत्रिक विद्यालय येथे आयटीआय मुंबईचे नामकरण भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर शासकीय औद्योगिक संस्था मुंबई-१ असे करण्यात आले आहे. त्याचबरोबर काही दिवसांपूर्वी कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी २६ शासकीय औद्योगिक संस्थांचे नामकरण होणार असल्याचे देखील सांगितले होते.

आज झालेल्या कार्यक्रमास उत्तर प्रदेशचे विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री अनिल कुमार, राष्ट्रीय लोकदलचे महासचिव के पी चौधरी, माजी लोकसभा सदस्य मलुक नागर, कौशल्य विकास विभागाचे सचिव गणेश पाटील, कौशल्य विकास आयुक्त प्रदिप डांगे, कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ अपूर्वा पालकर, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक सतीश सूर्यवंशी उपस्थित होते.

संत गाडगेबाबा स्वच्छ भारत प्रबोधिनीचे प्रतिनिधी असलेल्या मुंबईच्या दिप्ती जाधव, पुण्याचे सुरज महाजन, छत्रपती संभाजीनगरचे सागर भारती, नाशिकचे प्रमोद दुंगी, नागपूरचे प्रदीप काटकर, अमरावतीचे प्रफुल्ल भुसारी यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad