कर्नाक रेल्वे उड्डाणपुलावरील पहिला गर्डर बसवला - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

21 أكتوبر 2024

कर्नाक रेल्वे उड्डाणपुलावरील पहिला गर्डर बसवला


मुंबई - मशीद बंदर रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर असलेला व पी. डिमेलो मार्गाला जोडणा-या कर्नाक रेल्वे उड्डाणपूल प्रकल्पातील महत्वाचा टप्पा असलेला पहिला गर्डर यशस्वीरित्या बसवण्यात आला आहे.

मध्‍य रेल्‍वे प्रशासनाने शनिवार, दिनांक १९ ऑक्‍टोबर २०२४ आणि रविवार, दिनांक २० ऑक्‍टोबर २०२४ रोजी मध्‍यरात्री १२.३० ते पहाटे ३.३० या तीन तासांच्‍या विशेष वाहतूक व वीज पुरवठा या दोन्‍ही घटकांमध्‍ये खंड (ब्‍लॉक) दरम्‍यान लोखंडी तुळई स्‍थापित करण्‍यात आली. तुळई स्थानांतराची (साईड शिफ्टिंग) प्रक्रिया पूर्ण झाल्‍याने आता दुसरी तुळई बसविण्‍याच्‍या प्रक्रियेला वेग मिळणार आहे.

दक्षिण मुंबईतील मशीद बंदर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि मोहम्मद अली मार्ग परिसरातील वाहतुकीसाठी कर्नाक पूल महत्त्वाचा आहे. लोकमान्य टिळक मार्गावरील कर्नाक पूल धोकादायक झाल्यामुळे बृहन्मुंबई महानगरपालिकेने या पुलाच्या पुनर्बांधणीचे काम हाती घेतले आहे. या प्रकल्प अंतर्गत ५५० मेट्रिक टन वजनाची दक्षिण बाजूची लोखंडी तुळई (गर्डर) रेल्वे भागावर ७० मीटरपर्यंत सरकविण्याची कार्यवाही गत सोमवारी (दिनांक १४ ऑक्‍टोबर २०२४) पूर्ण झाली. मध्य रेल्वे प्रशासनाच्या परवानगीनंतर व शनिवार, दिनांक १९ ऑक्‍टोबर २०२४ आणि रविवार, दिनांक २० ऑक्‍टोबर २०२४ रोजी रेल्वे 'ब्लॉक' मिळाल्यानंतर तुळई स्थापित करण्याची कार्यवाही पूर्ण करण्‍यात आली आहे. मध्य रेल्वे प्रशासनाने मंजूर केलेल्या आराखड्यानुसार व मध्य रेल्वेने निर्देश केल्याप्रमाणे मेसर्स राईट्स लिमिटेड यांच्या तांत्रिक पर्यवेक्षण अंतर्गत हे कामकाज पूर्ण करण्यात आले आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्या मार्गदर्शनाखाली पूल विभागाने मध्य रेल्वे प्रशासनासह योग्य समन्वय साधून ही कार्यवाही पूर्ण केली आहे. प्रमुख अभियंता (पूल) उत्तम श्रोते, उपप्रमुख अभियंता (पूल) शहर राजेश मुळे यांच्यासह संबंधित अधिकारी, कर्मचारी, कामगार यांनी योग्य नियोजन करून तुळई स्‍थापित करण्‍यात आली आहे.

सुमारे ७० मीटर लांब आणि ९.५० मीटर रुंद आकाराच्या या तुळईचे वजन सुमारे ५५० मेट्रिक टन आहे. तुळई बसवण्यासाठी रेल्वे रुळालगत तुळई पूर्णतः अधांतरी (कॅण्‍टीलिवर) होती. त्यानुसार गत सोमवारी (दिनांक १४ ऑक्‍टोबर २०२४) तुळई पूर्वेकडून पश्चिमेकडे सरकवण्यात आली. तर, शनिवार, (दिनांक १९ ऑक्‍टोबर २०२४) आणि रविवार, दिनांक २० ऑक्‍टोबर २०२४ रोजी रेल्वे सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून कामाची जोखीम व तांत्रिक बाबी तपासून, त्याचप्रमाणे रेल्वे वाहतूक व वीज पुरवठा या दोन्ही घटकांमध्ये खंड (ब्लॉक) मिळाल्यानंतर तुळई स्थापनेचे कामकाज पूर्ण करण्यात आले आहे. त्‍यानंतर तुळईवर लोखंडी सळया अंथरून सिमेंट कॉंक्रिटीकरण करण्यात येईल. पुलाचे क्युरींगचे काम पूर्ण झाल्यानंतर त्यावर मास्टिकचे काम पूर्ण करण्यात येईल. या दरम्यानच पुलाच्या प्रवेश मार्गिकांचे (approach road) काम हाती घेतले जाणार आहे.

या कार्यवाहीनंतर, आता दुसरी तुळई बसविण्‍याच्‍या प्रक्रियेला वेग दिला जाणार आहे. डिसेंबर २०२४ अखेरपर्यंत पूलाची दुसरी तुळई बसविण्‍याचे आणि उर्वरित कामे पूर्णत्वास नेण्याचे नियोजित आहे.

ليست هناك تعليقات:

إرسال تعليق

Post Bottom Ad

JPN NEWS