मुंबई - छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास वर्णन करण्यासाठी जी शक्ती, उर्मी लागते ती आजच्या ‘शिवराज्य’ या बहारदार सांस्कृतिक सादरीकरणात पदोपदी दिसून आली. रंगमंचावरील प्रत्येक विद्यार्थ्यांने आपल्या अदाकारीने सादरीकरणात जिवंतपण आणला. परिणामी, आजच्या या कार्यक्रमाने सांस्कृतिक नोंद घेण्याइतकी उंची गाठली, असे म्हणायला हरकत नाही, अशा शब्दात गंधर्व महाविद्यालयाचे कुलसचिव विश्वास जाधव यांनी ‘शिवराज्य’ या सादरीकरणात सहभागी विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभाग अंतर्गत, संगीत व कला अकादमीच्या संगीत विभागातर्फे दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील जागतिक संगीत दिनाच्या निमित्ताने ‘संगीत सप्ताह’चे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहाचा उद्घाटन समारंभ विले पार्ले (पूर्व) येथील मास्टर दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात आज (दिनांक ७ ऑक्टोबर २०२४) पार पडला. उद्घाटनाच्या निमित्ताने शालेय विद्यार्थ्यांचा गायन, नृत्य व नाट्याचा ‘शिवराज्य’ हा शतरंगी कार्यक्रम देखील सादर करण्यात आला आला. यावेळी जाधव बोलत होते.
विश्वास जाधव म्हणाले, कोणताही शासकीय कार्यक्रम असला, की त्याची धाटणी ठरलेली असते. एका विशिष्ट चौकटीत तो कार्यक्रम पार पडतो. परंतु आजच्या ‘शिवराज्य’ सांस्कृतिक सादरीकरणाने या सर्व चौकटी मोडीत काढल्या. रंगमंचावर विद्यार्थ्यांनी साकारलेली ‘शिवशाही’ पाहून अंगावर अक्षरश: रोमांचे उभे राहीले. आपल्या पाल्यांना बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शाळेत पाठवणाऱ्या पालकांचे आणि शैक्षणिक प्रगतीसह विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणाऱ्या शिक्षकांचाही यात तितकाच वाटा आहे.
उप आयुक्त डॉ. प्राची जांभेकर म्हणाल्या की, प्रत्येक विद्यार्थ्यातील कलागुण ओळखून त्याला ते सादर करण्यासाठी संधी देणाऱ्या शिक्षकांचे या सादरीकरणात खूप मोठे योगदान आहे. रंगमंचावर वावरतांना ही मुले कुठेही डगमगली नाही. या मुलांनी प्रमुख पाहण्यांना, पालकांना, प्रेक्षकांना तसेच स्वत:लाही खूप आनंद दिला आहे.
अभिनेत्री पल्लवी वाघ-केळकर म्हणाल्या की, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाचे कौतुक करावे लागेल. विद्यार्थ्यांमध्ये कलेची आवड निर्माण करण्याची आणि ती जोपासण्याची शक्ती महानगरपालिकेच्या शाळांमध्ये आणि शिक्षकांमध्ये आहे. विविध संगीत स्पर्धांपेक्षा संगीत महोत्सवांमध्ये सृजनशीलतेला वाव मिळतो, हे आजच्या कार्यक्रमाने सिद्ध करून दिले.
No comments:
Post a Comment