मुंबई - विधानसभा निवडणुकीसाठी त्यांना उमेदवारी न मिळाल्याने काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मुंबई महापालिकेतील माजी विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी (Ravi Raja Resigns) यांनी काँग्रेसच्या सदस्यत्त्वाचा राजीनामा देत भाजपमध्ये (BJP) प्रवेश केला आहे. भाजपात त्यांना मुंबई उपाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. यावर काँग्रेसच्या खासदार आणि मुंबई अध्यक्ष वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
रवी राजा हे गेले 40 वर्षे काँग्रेसमध्ये होते. 5 वेळा ते मुंबई महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले होते. त्यांनी पालिकेत विरोधी पक्ष नेता तसेच बेस्ट समितीमध्ये आपल्या कामाचा ठसा उमटवला होता. मुंबई महापालिका आणि बेस्टमध्ये त्यांनी मुंबईकरांच्या प्रश्नावर नेहमीच आवाज उचलला होता. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत सायन कोळीवाडा येथून त्यांना काँग्रेसने उमेदवारी नाकारली होती. त्या निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाला होता. यंदाच्या 2024 च्या निवडणुकीतही काँग्रेसने त्यांना उमेदवारी नाकारत मागील वेळी पराभव झालेल्या उमेदवाराला पुन्हा उमेदवारी दिली. यामुळे नाराजी व्यक्त करतं रवी राजा यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला.
आज भाजपचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई अध्यक्ष आमदार आशीष शेलार, आमदार तामिळ सेलवन यांच्या उपस्थित रवी राजा यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी बोलताना रवी राजा म्हणाले की, माझ्या 40 वर्षातील अनुभवाचा फायदा भाजपाला वाढवण्यासाठी करणार आहे. पक्षात प्रवेश दिल्याबद्दल त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, भाजपा अध्यक्ष जे. पी. नड्डा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई अध्यक्ष आमदार आशीष शेलार याचे आभार मानले आहेत.
काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांची संतप्त प्रतिक्रिया -
काँग्रेसच्या खासदार आणि मुंबई अध्यक्ष वर्षा गायकवाड म्हणाल्या की, दोन दिवसापूर्वी आम्ही रवी राजा यांना भेटलो. आमचे प्रभारी सुद्धा भेटले. आमची चर्चा त्यांच्यासोबत झाली. एखादं तिकीट मिळालं नाही म्हणून नाराज होणं चुकीचं आहे. पक्षाशी एकनिष्ठ राहायला हवं. सत्ता मिळत नाही, तिकीट नाही मिळालं म्हणून दुसऱ्या पक्षात जाणं योग्य नाही. आज रवी राजा जो चेहरा बनला तो पक्षांमुळे बनला होता. पाचवेळा ते नगरसेवक राहिले आहेत. रवी राजा यांची नाराजी जग जाहीर आहे. त्यांना तिकीट मिळालं नाही म्हणून त्यांनी पक्ष बदलला आहे.
वर्षा गायकवाड पुढे म्हणाल्या की, आता त्यांना भाजपमध्ये कुठले पद दिले त्याच्याबद्दल मला माहीत नाही. रवी राजा आणि आमचा आता संबंध संपला. त्यांनी आता जिथे आहे तिथे राहावं. त्यांना काँग्रेस पक्षाने विरोधी पक्ष नेतेपद दिलं, हे पद हे आमदाराच्या बरोबरीने होतं. मात्र, आता तुम्हाला आमदारकीचे तिकीट मिळत नाही म्हणून तुम्ही पक्ष सोडून जाता. त्यांचे काही मागचे प्रकरण सुद्धा याला कारणीभूत होते. त्यांनी हा निर्णय घेताना या प्रकरणाचा सुद्धा विचार केला असणार.
No comments:
Post a Comment