मुंबई - समाजवादी, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना महाविकास आघाडीचे ‘भिवंडी पूर्व’चे उमेदवार रईस कासम शेख यांनी मंगळवारी दुपारी विधानसभा उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी महाविकास आघाडीच्या सर्व पक्षांच्या कार्यकर्त्यांनी केजीएन चौक ते प्रांत कार्यालयापर्यंत विशाल रॅली काढत जोरदार शक्तीप्रदर्शन केले. अयोद्धेचे समाजवादी पक्षाचे खासदार अवधेश प्रसाद यांना भेटण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
अर्ज दाखल करताना समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व आमदार अबु आझमी आणि भिवंडीचे राष्ट्रवादीचे (शरद पवार) खासदार बाळ्यामामा म्हात्रे उपस्थित हाेते.
उमेदवारी अर्ज दाखल करताना मोठी हजेरी लावल्याबद्दल उमेदवार रईस शेख यांनी भिवंडीकरांचे आभार मानले. राज्याचे मँचेस्टर समाजल्या जाणाऱ्या भिवंडीत गेल्या पाच वर्षात ८४० कोटींची विकास कामे केल्याचे शेख यांनी सांगितले. भिवंडीला राज्यातले पहिल्या क्रमांकाचे शहर बनवण्यासाठी पुन्हा संधी द्या, असे आवाहन उमेदवार रईस शेख यांनी भिवंडीकरांना केले.
सपा अध्यक्ष अखिलेश यादव यांनी उत्तर प्रदेशात ‘पीडीए’ (पिछाडा, दलित अल्पसंख्यांक) मोट बांधून भाजपला अस्मान दाखवले, त्याची पुनरावृत्ती महाराष्ट्रातील जनतेने ‘मविआ’ सत्तेत आणून करावी. भिवंडीतील भाईचारा टिकवण्यासाठी व समस्या संपवण्यासाठी रईस शेख यांना पुन्हा निवडून द्या, असे असे आवाहन अयोद्धेचे समाजवादी पक्षाचे खासदार अवधेश प्रसाद यांनी केले.
लोकसभा निवडणुकीत समाजवादीच्या कार्यकर्त्यांनी दिलेली साथ आपण विसरणार नाही, असे राष्ट्रवादीचे स्थानिक खासदार बाळ्यामामा म्हात्रे म्हणाले. अखिलेशजी यांना मी भिवंडी राखण्याचा शब्द दिला असून माझा शब्द खाली पडू देवू नका, अशी विनंती सपा प्रदेशाध्यक्ष अबु आझमी यांनी केली.
यावेळी रॅलीमध्ये ‘मविआ’च्या सर्व घटक पक्षांचे कार्यकर्ते, स्थानिक पदाधिकारी व सामान्य भिवंडीकर मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ‘मविआ’च्या घटक पक्षाच्या झेंड्यानी भिवंडीतील वातावरण रंगीबेरंगी झाले होते. ‘रईस शेख आगे बढो, हम तुम्हारे साथ है’, अशा घोषणा रॅलीमध्ये दिल्या जात होत्या.
ليست هناك تعليقات:
إرسال تعليق