मुंबई - विनापरवाना फटाके विक्री करणे कायद्याने गुन्हा आहे. विनापरवाना फटाके विक्रेत्यांवर महापालिकेकडून दरवर्षी कारवाई केली जाते. मात्र यंदा मुंबई महापालिकेच्या २४ पैकी ८ विभागातून बेकायदेशीर फटाके विक्री करणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करण्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. यामुळे दिवाळीत प्रदूषण वाढवणास मदत करणाऱ्या अधिकाऱ्यांवर पालिका आयुक्त कारवाई करणार का असा प्रश्न मुंबईकरांकडून उपस्थित केला जात आहे. (Mumbai News)
२२९.२५ किलो फटाके जप्त -
मुंबई महापालिकेकडून रस्त्यावर विना परावाना फटाके विक्री करणाऱ्या दुकानदारांविरोधात अधिनियम ३१४ (क) नुसार अतिक्रमण निर्मूलनाची कारवाई केली जाते. यंदाही २५ ऑक्टोबरपासून २९ ऑक्टोबरपर्यंत विना परवाना फटाके विक्री करणाऱ्या दुकानदारांविरोधात पालिकेने कारवाई केली. त्यानुसार २९ ऑक्टोबर रोजी १६६.२५ किलो फटाके तर २५ ते २९ ऑक्टोबर दरम्यान २२९.२५ किलो फटाके जप्त करण्यात आले आहेत.
या ८ विभागात कारवाईकडे दुर्लक्ष -
मुंबई महापालिकेची एकूण २४ विभाग कार्यालये आहेत. या सर्व विभागातून ही कारवाई करणे अपेक्षित असताना केवळ १६ विभागात कारवाई करण्यात आली आहे. तर ए, सी, जी उत्तर, एच पश्चिम, पी उत्तर, आर दक्षिण, एम पूर्व आणि एन या ८ विभागात कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. या ८ विभागातील अधिकाऱ्यांनी बेकायदेशीर फटाके विक्रेत्यांकडे दुर्लक्ष केल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे मुंबईमध्ये दिवाळी दरम्यान प्रदूषण वाढत असताना पालिका अधिकाऱ्यांनीच प्रदूषण वाढवण्यास मदत केली आहे.
No comments:
Post a Comment