मला हलक्यात घेऊ नका - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

12 October 2024

मला हलक्यात घेऊ नका - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 

मुंबई - विकास कामांमध्ये स्पीडब्रेकर टाकणारे आणि ब्रेकर लावणारे सरकारकडून आम्ही उखडून टाकले. कट्टर शिवसैनिक मैदान आणि विचारही सोडत नाही. मैदानातून पळणारा नाही तर मैदानातून पळवणारा मी बाळसाहेबांचा शिवसैनिक आहे, मला हलक्यात घेऊ नका, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उबाठाला सडेतोड इशारा दिला. आझाद मैदान येथे भरलेल्या शिवसेनेच्या विशाल दसरा मेळाव्यात मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर टीकेची तोफ डागली.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, आझाद शिवसेनेचा हा आझाद मेळावा आहे. आझाद मैदानावर भगवा उत्साह संचारला आहे. मात्र हिऱ्यापोटी जन्माला आलेल्या गारगोट्यांना हिंदू म्हणून घेण्यास लाज वाटते, असा टोला त्यांनी उबाठाला लगावला. महाराष्ट्र विरोधी आघाडीला घरी पाठवून आपले सरकार आले. काही लोक म्हणत होते हे सरकार १५ दिवसांत पडेल, एक महिन्यात पडेल, सहा महिन्यात पडेल पण टीका करणाऱ्या हा एकनाथ शिंदे पुरा पडला. तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने घासून पुसून नाही तर ठासून दोन वर्ष मुख्यमंत्री म्हणून पूर्ण केली. माझी दाढी त्यांना खूपते पण होती दाढी म्हणून तुमची उध्वस्त केली महाविकास आघाडी आणि महाराष्ट्राच्या विकासाची जोरात धावू लागली गाडी, असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला.

गेली २५ वर्ष मुंबईत तुमची सत्ता होती, पण तुम्हाला लोकांच्या सुखदुखाची काही घेणंदेण नव्हतं. तुम्ही बंगल्यावर बंगले बांधले पण धारावीकराला त्याच चिखलात ठेवण्याचे काम केले, अशी टीका त्यांनी उबाठावर केली. धारावीतील सर्वच २ लाख १० हजार झोपडीधारकांना घरे देण्याचे आदेश दिले. धारावीकरांनी विरोधकांच्या भुलथापांना बळी पडू नये, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.

ते पुढे म्हणाले की, उठाव केला नसता तर फक्त फेसबुक लाईव्ह झाले असते. मुंबईच्या रस्त्याच्या कामांत, डांबरात, नाल्यातील कचऱ्यात तुम्ही पैसे खाल्ले. कोविडमध्ये खिचडी, बॉडीबॅगमध्ये पैसे कोणी खाल्ले? मढ्याच्या टाळुवरचे लोणी खाणारे तुम्ही, तुमच्या तोंडाला लागलेले शेण लपणार नाही. इथे लोक मरत होती आणि तुम्ही पैसे मोजत होता, अशी घणाघाती टीका मुख्यमंत्र्यांनी उबाठावर केली. अडीच वर्षे महाविकास आघाडीने मेट्रो, बुलेट ट्रेन, जलयुक्त शिवार, मेट्रो कारशेड, मराठवाडा वॉटर ग्रीड सारख्या प्रकल्पांना ब्रेकर लावण्याचे काम केले. मात्र आम्ही सगळे स्पीडब्रेकर आणि ब्रेकर लावणारे सरकारकडून उखडून टाकले. जिथं नव्हता ब्रोकर तिथं त्यांनी टाकले स्पीडब्रेकर असा खरमरीत टोला त्यांनी लगावला. बालहट्टामुळे मेट्रोचा खर्च १७००० कोटींनी वाढला. तेवढे पैसे वाचले असते तर लाडक्या बहिणीला १५०० रुपयांऐवजी ३००० रुपये दिले असते, असे ते म्हणाले. सव्वा दोन वर्षातील महायुती सरकारचे काम समोर ठेवायला तयार आहे तुम्हीही अडीच वर्षात फेसबुक लाईव्हशिवाय काय केल याची चर्चा होऊ द्या, असे आव्हान त्यांनी यावेळी विरोधकांना दिले. प्रत्येक तालुक्यात सरकार संविधान भवन बांधणार आहे. त्यासाठी १० लाख रुपये देणार आहोत. शेतकऱ्यांना सरकारने ४६००० कोटींची मदत केली. गरिबाचा मुलगा मुख्यमंत्री झाला म्हणून तुम्हाला पचत नाही का, असा सवाल त्यांनी केली.

राज्यातील जनता महायुतीला अधिक मते देऊन विजयी करणार. माझ्या लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, ज्येष्ठ नागरिक आणि शेतकरी या सरकारचे ब्रॅंड अँम्बेसेडर आहेत. विधानसभेत तुम्हाला ताठ मानेने लोकांसमोर जाण्याची संधी दिलीय. फेक नरेटिव्ह खोडून काढा. विधानसभेसाठी हिंदुत्वाची शान राखण्याचा आणि विरोधकांना चारीमुंड्या चीत करण्याचा निर्धार करा, असे आवाहन त्यांनी केले. निवडणुकीनंतर विधानसभेवर महायुतीचाच भगवा पुन्हा फडकेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. तत्पूर्वी मंत्री गुलाबराव पाटील, नेते रामदास कदम, शिवसेना प्रवक्त्या डॉ. ज्योती वाघमारे यांची भाषणे झाली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad