मुंबई - महाराष्ट्रात सर्व औद्योगिक संस्थांमध्ये संविधान मंदिर उभारले जाईल अशी घोषणा कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केली होती. त्याचाच एक भाग म्हणून आज मंत्रालयात संविधान मंदिर उभारण्यात आले. तसेच महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाचे रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ असे नामकरण करण्यात आले आहे. कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी सदर निर्णयाबद्दल आज माहिती दिली.
रतन टाटा यांचे विविध क्षेत्रांच्या व उद्योगांच्या विकासासाठी दिलेले योगदान अतुलनीय आहे. त्याचबरोबर नवीन उद्योगांना सुद्धा त्यांनी वेळोवेळी पुढाकार घेऊन सहकार्य केले. उद्योग क्षेत्रातील या महान विभूतीच्या कार्याला आदरांजली देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाचे नाव बदलून रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ असे करण्यात आले आहे. या विद्यापीठाच्या माध्यमातून उद्योगांना कुशल मनुष्यबळ पुरवणे तसेच नवोदितांच्या संकल्पनांना बळ देण्याचे उद्दिष्ट आहे. हा उद्देश श्री रतन टाटा यांच्या विचारांचा आरसा असून त्याचे आचरण म्हणजेच त्यांच्या कार्याला खरी आदरांजली आहे. या नामकरणामुळे विद्यापीठाच्या माध्यमातून होणाऱ्या तांत्रिक प्रगतीस चालना मिळेल आणि युवकांना रतन टाटा यांच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या विद्यापीठात शिक्षण घेण्याचा अभिमान वाटेल.
याबाबत पत्रकारांशी संवाद साधतांना मंत्री लोढा म्हणाले "पद्मविभूषण रतन टाटा यांच्या निधनाने संपूर्ण देश हळहळला. तांत्रिक, औद्योगिक सर्वच क्षेत्रात टाटा समूहाचे नाव अग्रणी आहे. अनेकांना कौशल्य प्रदान करून रोजगार त्यांनी दिलेला आहे. त्यामुळे भारतातील पहिला कौशल्य विद्यापीठास त्यांचे नाव मिळावे ही अतिशय सन्मानाची गोष्ट आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सदर निर्णयास पाठिंबा दिल्याबद्दल मी त्यांचे मनःपूर्वक आभार मानतो"
मंत्रालायात स्थापन झाले संविधान मंदिर -
कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या प्रयत्नातून राज्यातील सर्व औद्योगिक संस्थांमध्ये जागतिक लोकशाही दिनाचे औचित्य साधून ४३४ औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये 'संविधान मंदिर लोकार्पण झाले. आपले संविधान आणि त्याचे महत्व, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार संविधान मंदिराच्या माध्यमातून नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा उभा उपक्रमाचा उद्देश आहे. त्याप्रमाणेच मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात देखील संविधान मंदिर उभारण्यात आले आहे. यामुळे संविधानाचे मूल्ये अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यास अधिक मदत होईल.
ليست هناك تعليقات:
إرسال تعليق