मुंबई - अहंकारापोटी मेट्रो ३ प्रकल्पाला विरोध करून प्रकल्पावर १४ हजार कोटींचा भुर्दंड लादला, त्याचा हिशेब आदित्य ठाकरे यांनी आधी द्यावा असा परखड सवाल शिवसेना प्रवक्त्या डॉ. मनीषा कायंदे यांनी केला. सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेल्यांनी आयुष्यात केवळ तीनवेळा लोकलने प्रवास केलाय, त्यामुळे जनतेचे हाल त्यांना काय कळणार, अशी टीका डॉ. कायंदे यांनी यावेळी केली. बाळासाहेब भवन येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.
त्या म्हणाल्या की, मुंबईत मेट्रो-३ चा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुभारंभ झाला. याबद्दल राज्य सरकार आणि केंद्र सरकार अभिनंदनास पात्र आहेत. अनेक वर्ष मुंबईकर या मेट्रोची वाट पाहत होते. वर्ष २०१८ मध्ये या प्रकल्पाला मंजुरी मिळाली होती मात्र त्यानंतर यात अनेक अडथळे निर्माण झाले. तांत्रिक अडचणी समजू शकतो पण काहींचा अहंकार मेट्रो-३ मधील प्रमुख अडथळा बनला, अशी टीका डॉ. कायंदे यांनी केली. अडथळा निर्माण केला त्यांनी सामजिक संघटनांना पुढे करुन कारस्थाने केली. मात्र आता मुंबईतील पहिली भूमिगत मेट्रो सुरु झाल्याने त्यांना पोटशूळ उठलाय, अशी टीका त्यांनी यावेळी केली.
दावोस दौऱ्याचा सरकारकडे दीड कोटींचा हिशोब काय मागता त्यापूर्वी मेट्रो ३ रोखल्यामुळे झालेला १४ हजार कोटींच्या वाढीव खर्चाचा हिशेब द्यावा, असा सवाल डॉ. कायंदे यांनी आदित्य ठाकरेंना केला. दावोस दौऱ्याच्या २८ तासांत राज्यात ३. ५६ लाख कोटींचे गुंतवणूक करार झाले, असे त्या म्हणाल्या.
महाविकास आघाडी सरकारचा केंद्राशी कोणताही संवाद नव्हता. राज्यात पंतप्रधान आले तरी तत्कालीन मुख्यमंत्री त्यांच्या कार्यक्रमाला अनुपस्थित राहायचे, असे डॉ. कायंदे म्हणाल्या. उबाठा सरकार विकासाचे मारेकरी होते. त्यांनी प्रत्येक प्रकल्पात खोडा घालण्याचा प्रयत्न केला, अशी टीका डॉ. कायंदे यांनी केली.
No comments:
Post a Comment