मुंबई - समाजवादी पक्षाचे भिवंडी पूर्वचे आमदार रईस शेख यांनी शिवसेना नेते माजी मंत्री आणि आमदार आदित्य ठाकरे यांची भेट घेऊन महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यावर मुंबई पब्लिक स्कुल मॉडेल राज्यभर महाराष्ट्र पब्लिक स्कूल या नावाने राबविण्याची मागणी केली. तसेच त्याची सुरवात भिवंडीतून करण्याचीही मागणी शेख यांनी केली. यावेळी आदित्य ठाकरे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे रईस शेख यांनी सांगितले.
शेख यांनी मातोश्री निवासस्थानी आदित्य ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान विविध सामाजिक आणि राजकीय विषयांवर चर्चा झाल्या. त्यामध्ये शेख यांनी भिवंडी मध्ये २२/६२ क्रमांकाच्या शाळेचा पुनर्विकास करून ठाणे जिल्यातील पहिली डिजिटल शाळा निर्माण केली याबाबतही चर्चा केली.
यावेळी बोलताना आमदार रईस शेख म्हणाले की, आदित्य ठाकरे यांच्या पुढाकाराने बृहन्मुंबई महापालिका शाळांमध्ये ‘मुंबई पब्लिक स्कूल’ (एमपीएस) मॉडेल राबविले गेले. या मॉडेलमुळे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या इंग्रजी शाळांमध्ये २७ टक्के तर पूर्व प्राथमिक वर्गात १२५ टक्के विद्यार्थी प्रवेश वाढले होते. बृहन्मुंबई महापालिकेच्या शाळांकडे विद्यार्थी व पालकांचा कमी झालेला ओघ पुन्हा वाढला आहे, असेही शेख यांनी नमूद केले.
पुढे बोलताना आमदार रईस शेख म्हणाले की, या विधानसभा निवडणुकीनंतर ‘मविआ’ची सत्ता राज्यात येईल. आगामी सरकारमध्ये आदित्य ठाकरे धोरणकर्त्यांची भूमिका बजावतील. त्यामुळे बृहन्मुंबई महापालिका शाळांमध्ये राबवलेले ‘मुंबई पब्लिक स्कूल’ मॉडेल राज्यातील सर्व सरकारी शाळांमध्ये 'महाराष्ट्र पब्लिक स्कूल' या नावाने राबवावे. आपण मुंबईत यशस्वीरीत्या राबविलेल्या नावीन्यपूर्ण असा उपक्रम राज्यभर विस्तारित करणे गरजेचे आहे. महविकास आघाडीचे सरकार आल्यावर आपण ह्या नावीन्यपूर्ण उपक्रमाचा प्राधान्याने विस्तार करावा आणि त्याचा प्रारंभ भिवंडीतून करावा, अशी मागणी केल्याचे शेख यांनी नमूद केले.
२२/६२ क्रमांकाची शाळा -
भिवंडीतील गैबीनगर येथील ही मुलींची उर्दू शाळा आहे. आम्ही या शाळेसाठी ९ कोटी रुपये खर्च केले. आज या शाळेची विद्यार्थीक्षमता १९२० आहे. चार मजली या शाळेत असेंब्ली हॉल, प्रयोगशाळा, ग्रंथालय, प्रत्येक मजल्यावर स्वच्छतागृह, स्पोर्ट टर्फ, सीसीटीव्ही निगराणी, प्रत्येक मजल्यावर फिल्टरचे पाणी तसेच कर्मचारी आणि मुख्याध्यापक यांच्यासाठी स्वतंत्र कक्ष आहेत.
No comments:
Post a Comment