मुंबई - महाराष्ट्र राज्याच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या माध्यमातून सुरु असलेल्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसाठी नाव नोंदणी केलेल्या आणि सध्या आस्थापनांच्या माध्यमातून इंटर्नशिप करत असलेल्या ४६ हजार विद्यार्थ्यांना विद्यावेतनाचा पहिला हप्ता मिळणार असल्याची माहिती राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दिली. सदर विद्यावेतन विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात DBT मार्फत थेट जमा करण्यात येणार आहे. याकरिता राज्य सरकारकडून ४२ कोटी रुपये वितरित करण्यात येणार असल्याचे मंत्री लोढा यांनी यावेळी सांगितले.
शासनामार्फत प्रशिक्षणार्थीच्या बँक खात्यात मासिक विद्यावेतन डीबीटीद्वारे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर २०२४ या महिन्यामध्ये प्रशिक्षणासाठी रुजू होऊन प्रशिक्षण घेत असलेल्या ४६ हजार प्रशिक्षणार्थ्यांचे एकूण ४२ कोटी विद्यावेतन यावेळी अदा करण्यात येत आहे.
प्रत्यक्ष कार्य प्रशिक्षणाद्वारे युवकांना रोजगारक्षम बनवण्याच्या दृष्टीने सुरु करण्यात आलेल्या या योजनेचा महाराष्ट्रातील युवक मोठ्या प्रमाणावर लाभ घेत असल्याचे याप्रसंगी दिसून येते. रोजगार व स्वयंरोजगाराच्या विविध संधी उपलब्ध असूनही बेरोजगार उमेदवारांना कामाचा प्रत्यक्ष अनुभव नसल्यामुळे रोजगार अथवा स्वयंरोजगार प्राप्त होण्यास अडचणी येत होत्या. यावर उपाययोजना म्हणून शासनाने "मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण" योजना सुरु केली.
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेद्वारे राज्यातील युवकांना उद्योजकांकडे ऑन जॉब ट्रेनिंग देऊन रोजगारक्षम करण्यात येईल व त्यामुळे उमेदवारांना रोजगाराच्या अधिकाअधिक संधी उपलब्ध होतील, हाच उद्देश ठेवण्यात आला आहे. या योजनेकरिता राज्य सरकारकडून ५५०० कोटी निधी मंजूर करण्यात आले आहेत.
९ ऑक्टोबर २०२४ रोजी प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात एकूण ३ लाख ६९ हजार ७९८ प्रशिक्षणार्थीनी नोंदणी केली असून, १ लाख ७९ हजार ३१८ प्रशिक्षणार्थीना नियुक्ती देण्यात आली आहे. यामध्ये ८७ हजार १४९ प्रशिक्षणार्थी रुजू झाले असून, १०५८६ आस्थापनांनी याकरिता नोंदणी केली आहे.
ليست هناك تعليقات:
إرسال تعليق