सांगली - कृष्णा नदीत गतवर्षीची गणेशमूर्ती विसर्जित करताना तीन युवक सरकारी घाटाजवळ बुडाले, त्यापैकी एकाला वाचविण्यात यश आले. आदित्य अजय रजपूत (वय १६) व अक्षय मनोज बनसे (१८, दोघेही रा. रामटेकडी, शिवाजी मंडईजवळ, सांगली) अशी बुडालेल्या युवकांची नावे आहेत. राज चव्हाण असे बचावलेल्या युवकाचे नाव आहे. गुरुवारी सायंकाळी पाचच्या सुमारास हा प्रकार घडला. स्पेशल रेस्क्यू टीम, आयुष हेल्पलाईन व महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी बुडालेल्या युवकांचा शोध घेतला. पण रात्रीपर्यंत ते सापडले नाहीत. अंधारामुळे शोधकार्य थांबविण्यात आले.
एकाला वाचवण्यात यश -
शहरातील शिवाजी मंडईसमोर वाल्मिकी मित्रमंडळाच्या वतीने प्रतिवर्षी गणेशोत्सव साजरा केला जातो. मंडळाकडून प्रतिष्ठापना केलेली गणेशमूर्ती वर्षभर ठेवली जाते. दुसऱ्यावर्षी नवीन गणेशमूर्ती प्रतिष्ठापनेपूर्वी गतवर्षीची मूर्ती विसर्जित करण्याची परंपरा आहे. गुरुवारी मंडळाचे दहा ते बारा कार्यकर्ते गतवर्षीची गणेशमूर्ती विसर्जित करण्यासाठी सरकारी घाटावर गेले होते. सहाजण मूर्ती विसर्जनासाठी नदीपात्रात उतरले. सध्या कोयना धरणातून पाणी सोडल्यामुळे नदीची पाणी पातळी वाढली असून, पाण्याला मोठा वेग आहे. नदीपात्रात काही अंतरावर मूर्ती सोडून कार्यकर्ते बाहेर पडू लागले. मूर्ती अजून विसर्जित झाली नसल्याचे पाहून पुन्हा कार्यकर्ते पाण्यात उतरले. पण पाण्यातून माघारी फिरताना तिघेजण बुडू लागले. एका मच्छीमाराने धाडसाने उडी घेऊन राज चव्हाण या युवकाला वाचविले. तोपर्यंत आदित्य आणि अक्षय भोवऱ्यात अडकले.
अग्निशमन दलाची धाव -
दोघे युवक बुडाल्याचे समजताच महापालिका अग्निशमन दलाच्या जवानांनी नदीकाठी धाव घेतली. स्पेशल रेस्क्यू फोर्स, आयुष हेल्पलाईन, विश्वसेवा बोट क्लब यांनी नदीपात्रात शोध घेण्याचा प्रयत्न केला. परंतु काही वेळातच अंधार पडल्याने शोधकार्य थांबविण्यात आले. पोलिस उपनिरीक्षक महादेव पोवार, संदीप पाटील यांच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली.
कुटुंबीयांना धक्का -
दोन युवक बुडाल्याचे समजताच अक्षय व आदित्यच्या नातेवाईक व मित्रांनी नदीकाठी धाव घेतली. त्यांच्या कुटुंबीयांनाही मोठा धक्का बसला. नदीकाठावर नातेवाईक, महिलांना अश्रू अनावर झाले होते. आदित्य हा महाविद्यालयात शिक्षण घेत होता. त्याच्या पश्चात आई, भाऊ, बहीण आहेत. अक्षय हा एकुलता एक होता. त्याच्या पश्चात आई व बहिणी असा परिवार आहे. दोन्ही युवकांच्या वडिलांचे निधन झाले आहे. काबाडकष्ट करून दोघांच्या आईने कुटुंबाला सावरले आहे.
No comments:
Post a Comment