महिलांना बालकांना सुरक्षा देणे हे आपले पहिले आद्य कर्तव्य - ॲड. सुशीबेन शाह - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

26 سبتمبر 2024

महिलांना बालकांना सुरक्षा देणे हे आपले पहिले आद्य कर्तव्य - ॲड. सुशीबेन शाह


ठाणे - महिलांना बालकांना सुरक्षा देणे हे आपले पहिले आद्य कर्तव्य आहे. बालकांच्या हक्कांची पायामल्ली झाल्याचे प्रकरण समोर आले, तर तातडीने तक्रार नोंदवून घ्या. बदलापूर अत्याचार प्रकरणी नेमकी हीच चूक झाली आणि ती आपल्याला पुढे टाळायची आहे. त्यासाठी प्रत्येक पोलिस ठाण्यात बालसुरक्षा अधिकारी असला पाहिजे, असे आग्रही प्रतिपादन महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षा ॲड. सुशीबेन शाह यांनी केले. 

महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोग व पोलीस मुख्यालय ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने ठाण्यातील पोलिसांच्या सिद्धी हॉल येथे पोलिसांसाठी एक दिवसीय कार्यशाळा बुधवारी आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत उपस्थित पोलिसांना पोक्सो, जे जे ॲक्ट व इतर बालकांशी निगडीत कायद्यांविषयी सविस्तर माहिती तज्ज्ञांमार्फत देण्यात आली. त्या वेळी ॲड. शाह बोलत होत्या.

ॲड. सुशीबेन शाह पुढे म्हणाल्या की, पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सरकारी व खासगी शाळांचे ऑडिट करा. शाळेत गेल्यावर शौचालय, सीसीटिव्ही कॅमेरे, महिला कर्मचारी, तक्रार पेटी इ. गोष्टी आहेत का? याची तपासणी करा. 

विशेष पोलीस महानिरीक्षक अश्वती दोरजे म्हणाल्या की, बालकांवर अत्याचार झाल्यानंतर पालकांना समजावणे, मेडिकल टेस्टसाठी तयार करणे अशा बऱ्याच अडचणी पोलिसांना येतात. तसेच कुटुंबातील सदस्य पोलिसात तक्रार करण्यासाठी पुढे येत नाही. त्यामुळे बालकांना न्याय मिळत नाही. तसेच सपोर्ट पर्सनची मदत घेऊन तक्रार नोंदवू शकता. पोलीस दीदी आणि पोलीस काका हे गुड टच व बॅड टच शिकवतात. तर त्याबद्दल मुलांना माहिती द्या. 

बाल हक्क कार्यकर्ते संतोष शिंदे म्हणाले की, प्रत्येक पोलीस ठाण्यात बालकल्याण पोलीस अधिकारी असला पाहिजे. तसेच पोलिसांनी बाल कल्याण समितीला माहिती  देणे आवश्यक आहे. पोलीस हे खूप चांगले काम करत आहेत. परंतु त्यांना काम करताना अनेक अडचणी येतात. बऱ्याचशा प्रोसेस माहिती नसतात. मुलाशी संवाद कसा साधावा, शासकीय प्रक्रिया कशा कराव्यात, मुलांच्या सोबत काम करताना पोलिसांची भूमिका काय? याबद्दल शिंदे यांनी माहिती दिली.

महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलचे सदस्य ॲड. गजानन चव्हाण म्हणाले की, पोलिसांनी तपास कसा करावा आणि पुरावा गोळा कसा करावा? हे ठाणे व मुंबईच्या पोलिसांना सांगण्याची गरज नाही. गुन्हा नोंदवणे, पुरावा गोळा करणे आणि चार्टशीट सादर करणे मुख्य काम पोलिसांनी पहिले करावे. तसेच पोलिसांचे महत्त्वाचे काम कडक पुरावा न्यायालयासमोर सादर करणे.  बालकांसंबंधीचे कायदे तसेच नवीन कायदे, न्यायालयाची प्रक्रिया, बालकांना व पालकांना न्यायालयासमोर कसे सादर करावे इ. विषयी माहिती ॲड. चव्हाण यांनी दिली. 

त्रुटी रहित दोषारोप पत्र कसे असावे. पोक्सो प्रकरणात त्रुटी रहित दोषारोप पत्र सादर कसे करावे. दोषारोप पत्र हे सबळ पुराव्यानिशी कसे सादर करावे, इ. माहिती जिल्हा न्यायाधीश सेवानिवृत्त राजीव पांडे दिली. यावेळी, महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगाचे सदस्य ॲड. संजय सेंगर यांनीही पोलिसांना पोक्सो व जे जे ॲक्ट बद्दल माहिती दिली. 

याप्रसंगी, पोलीस उपआयुक्त (ठाणे) मीना मकवाना, सहायक पोलिस आयुक्त (ठाणे) ममता डिसूझा, पोलीस उपअधीक्षक राहुल झाल्टे, पोलीस निरीक्षक (क्राईम ब्रांच, ठाणे) चेतना चौधरी, महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगाचे सचिव भालचंद्र चव्हाण, महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगाच्या अवर सचिव तथा प्रशासकीय अधिकारी वंदना जैन, महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगाच्या सदस्या ॲड. नीलिमा चव्हाण, महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगाच्या सदस्या ॲड. जयश्री पालवे, विधी सल्लागार प्रमोद बाडगी यांच्यासह ठाणे जिल्ह्यातील सर्व पोलीस अधिकारी उपस्थित होते. 

ليست هناك تعليقات:

إرسال تعليق

Post Bottom Ad