मुंबई - बदलापूरच्या खासगी शाळेतील दोन चिमुकल्या मुलींवर कथीत लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आरोपी अक्षय शिंदे याचा काल पोलिसांकडून एन्काऊंटर करण्यात आला. यापार्श्वभूमीवर आता या प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर दुस-याच दिवशी एक मुलगी बेपत्ता झाली, असा खबळजनक आरोप आरटीआय कार्यकर्ते केतन तिरोडकर यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी हे प्रकरण सीबीआयकडे देण्यात यावे अशी मागणीही केली.
शाळेचे ट्रस्टी मानवी तस्करी आणि चाईल्ड पॉर्नोग्राफीत सहभागी असल्याचा गंभीर आरोपही केतन तिरोडकर यांनी आपल्या याचिकेतून केला आहे. तसेच बदलापूर घटनेचा गुन्हा नोंद झाल्याच्या दुस-याच दिवशी त्या शाळेतून अन्य एक मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार त्याच पोलिस ठाण्यात करण्यात आली होती. बड्या आरोपींना वाचविण्याचा प्रयत्न सुरू असल्याने संपूर्ण तपास तातडीने सीबीआयकडे वर्ग करण्याची मागणी तिरोडकर यांनी केली आहे. त्यांनी याप्रकरणी थेट मुंबई हायकोर्टात धाव घेत जनहीत याचिका दाखल केली आहे. दरम्यान, या आरोपीने आपल्याला माजी आयपीएस अधिकारी मीरा बोरवणकर यांना भेटण्याची इच्छा पोलिसांकडे व्यक्त केली होती असेही त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान, हायकोर्टाने स्थापन केलेल्या विशेष समितीपुढे जर आरोपी अक्षय शिंदे हजर झाला तर हे प्रकरण वेगळ्याच वळणार जाईल, या भीतीने त्याचा एन्काऊंटर झाल्याचा दावा याचिकेतून करण्यात आला आहे. तसेच ट्रस्टी आणि शाळेतून सीसीटीव्ही गायब करणारा कर्मचारी अद्याप फरार असल्याचं सांगत, ठाणे पोलिस आणि एसआयटीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
No comments:
Post a Comment