मशिदीचा अवैध भाग तोडण्यावरून धारावीत तणाव - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

21 September 2024

मशिदीचा अवैध भाग तोडण्यावरून धारावीत तणाव


मुंबई - धारावीत असणा-या एका मशिदीचा अवैध भाग तोडण्यासाठी गेलेल्या महापालिकेच्या पथकावर जमावाने दगडफेक केली. त्यात पालिकेच्या वाहनांची तोडफोड झाली. वाढता तणाव पाहता पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड घटनास्थळी पोहोचल्या असून, शांततेचे आवाहन केले आहे. दरम्यान पालिकेने अवैध बांधकाम काढण्यासाठी पाच ते सहा दिवसांचा कालावधी दिल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली. 

मुंबईतील धारावीत एक मशीद आहे. मात्र या मशिदीचा काही भाग अवैध असल्याचे सांगितले जात आहे. धारावीतील ९० फूट रोडवरील २५ वर्षे जुनी अशी ही सुभानिया मशीद आहे. या मशिदीचा अवैध भाग तोडण्यासाठी आज मुंबई महापालिकेचे पथक धारावीत गेले होते. मशिदीचा अवैध भाग तोडला जाणार आहे, याची माहिती धारावीतील मुस्लिम नागरिकांना मिळाल्यानंतर ही कारवाई रोखण्यासाठी रात्रीपासूनच याठिकाणी आंदोलन सुरू केले होते. 

धारावीतील लोकांचे म्हणणे आहे की, ही मशीद २५ वर्षे जुनी आहे. मशिदीसोबत लोकांच्या भावना जोडल्या गेल्या आहेत. त्यामुळे ही मशीद पाडू नये. परंतु पालिका अधिकारी आज या मशिदीचा अवैध भाग पाडण्यासाठी धारावीकडे रवाना झाले. त्यामुळे धारावीत तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली आहे. मशिदीवर कोणत्याही प्रकारची कारवाई करू देणार नाही, अशी ठाम भूमिका धरावीकरांनी घेतली आहे. पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

मशिदीवर कारवाई केली जाऊ नये - खा. वर्षा गायकवाड
दरम्यान, या मशिदीवर कोणत्याही प्रकारची कारवाई केली जाऊ नये, यासाठी मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा आणि खासदार वर्षा गायकवाड यांनी शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. याबाबत माहिती देताना काँग्रेस खासदारांनी एक्सवर पोस्ट करून लिहिले की, धारावीतील मेहबूब-ए-सुभानिया मशिदीला बीएमसीने पाडण्याच्या नोटीसबाबत मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली आणि लोकांच्या भावना जाणून घेतल्या. मुख्यमंत्र्यांशी सकारात्मक चर्चा झाली. संबंधित अधिका-यांशी बोलून कारवाई रोखली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. तरीदेखील आत बीएमसीचे पथक कारवाईसाठी धारावीत पोहोचले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad