आज डॉ. कुमार केतकर यांनी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा यांच्याशी संवाद साधला आणि शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी ह्दयरोग शल्यचिकित्सा विभागाचे प्रमुख डॉ. उदय जाधव, कार्डिओलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. अजय महाजन, शैक्षणिक अधिष्ठाता डॉ. हरीश पाठक, वैद्यकीय अधिक्षक डॉ. मोहन देसाई आदी उपस्थित होते. गरजू रूग्णांसाठीच्या आर्थिक हातभारासाठी सर्व उपस्थितांनी डॉ. केतकर यांचे आभार मानले.
केईएम रूग्णालयात येणाऱया आर्थिकदृष्ट्या गरजू रूग्णांना ह्दय प्रत्यारोपण विभागाच्या माध्यमातून माफक दरांमध्ये उपचार उपलब्ध होणार आहेत. या मदतीमुळेच शल्यचिकित्सा विभागात ५६ वर्षानंतर हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया पार पडली. या विभागासाठी आवश्यक असणारी कार्डिओग्राफ, नायट्रिक ऑक्साईड आदी उपकरणे ही परदेशातून आयात करण्यात आली. इटली, जर्मनी आदी देशातून आणलेल्या उपकरणांसाठी सुमारे दोन कोटी रूपयांचा निधी हा डॉ. कुमार केतकर यांनी आपल्या खासदार निधीतून पुरवला. तसेच लहान मुलांच्या (पेडिएट्रिक) विभागासाठी थेरोस्कोप खरेदीसाठी आवश्यक ५० लाख रूपयेदेखील याच निधीतून देण्यात आले.
डिसेंबर २०२३ ते मे २०२४ या कालावधीत हृदय प्रत्यारोपण विभागाच्या अनुषंगाने तयारीला सुरूवात झाली. दरम्यानच्या कालावधीत केंद्र सरकारच्या संचालक, वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन (DMER) यांच्या चमुच्या नेतृत्वात केईएम रुग्णालयात हृदय प्रत्यारोपण विभागाच्या ठिकाणी भेटी देण्यात आल्या. याठिकाणी आवश्यक उपकरणांच्या पूर्ततेनंतरच विभागामध्ये हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी जून २०२४ मध्ये परवानगी देण्यात आली.
No comments:
Post a Comment