Election 2024 - मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण, मतदार यादीत नाव जाणून घ्या - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

19 September 2024

Election 2024 - मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण, मतदार यादीत नाव जाणून घ्या


मुंबई - आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, भारत निवडणूक आयोग यांनी वेळोवेळी दिलेल्या निर्देशांनुसार मतदारांना सुलभतेने मतदान करता यावे, या दृष्टीकोनातून मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्ह्यातील मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण करण्यात आले आहे. यामध्ये प्रत्येक मतदान केंद्राच्या ठिकाणी पूर्वी असणारी सरासरी १५०० मतदारांची संख्या ही आता सरासरी १२०० ते १३०० पर्यंत असेल, त्यामुळे मतदान केंद्रांची संख्या वाढली आहे. यामुळे, मतदानाचे प्रमाण आणि वेग वाढेल. सबब, मतदान केंद्रांच्या या सुसूत्रीकरणाची माहिती मतदारांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. त्यामध्ये राजकीय पक्षांचे देखील सहकार्य अपेक्षित आहे. 

याच अनुषंगाने बृहन्मुंबईतील विविध मतदारसंघांमधील मतदार केंद्रांमध्ये झालेल्या सुसूत्रीकरणाची माहिती देण्यासाठी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसोबत बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयात आज सायंकाळी (दिनांक १९ सप्टेंबर २०२४) बैठक पार पडली. 

बृहन्मुंबई क्षेत्रातील मतदान केंद्रांची संख्या आता १० हजार १११ इतकी झाली आहे. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत विधानसभा निवडणुकीसाठी सुसूत्रीकरण केल्याने २०८ मतदान केंद्र वाढले आहेत. या सुसूत्रीकरणाची माहिती देण्यासाठी तसेच मतदारांमध्ये जनजागृती करण्याच्या उद्देशाने जिल्हा निवडणूक अधिकारी तथा बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्या मार्गदर्शनाखाली, अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी तथा अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांनी विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेतली आणि याबाबत सविस्तर माहिती दिली.  अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी तथा मुंबई शहर जिल्हाधिकारी संजय यादव, विशेष कार्य अधिकारी (निवडणूक) विजय बालमवार, संबंधित अधिकारी आणि विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित होते.

‘आपले मतदान केंद्र जाणून घ्या’ मोहीम-
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, बृहन्मुंबई क्षेत्रातील मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण करताना प्रामुख्याने एका मतदान केंद्रावर सरासरी १२०० ते १३०० मतदारसंख्या राहील, हे सूत्र लक्षात ठेवून मतदान केंद्रांची संख्या निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे, काही भागांमध्ये मतदान केंद्रांची संख्या वाढली आहे. तर, काही ठिकाणी मतदान केंद्रांचे विक्रेंद्रीकरण करण्यात आले आहे. परिणामी, या नवीन  बदलांसंदर्भात मतदारांना माहिती देण्यासाठी प्रशासनाच्या वतीने ‘आपले मतदान केंद्र जाणून घ्या’ म्हणजेच ‘Know Your Polling Station’ ही जनजागृती मोहीम हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत मतदार नोंदणी अधिकारी मतदारांच्या घरी जाऊन मतदान केंद्रांच्या ठिकाणामध्ये झालेल्या बदलांची माहिती देतील. याशिवाय, नोंदणीकृत मतदारांना लेखी पत्राद्वारे तसेच प्रसारमाध्यमांच्या माध्यमातूनही कळविण्यात येईल. 

डॉ. अश्विनी जोशी यावेळी  म्हणाल्या की, बृहन्मुंबईतील (मुंबई शहर जिल्हा व मुंबई उपनगर जिल्हा)  मतदान केंद्रांच्या सुसूत्रीकरणाविषयी निवडणुकीच्या प्रक्रियेत सहभागी असलेल्या कर्मचाऱ्यांकडून तसेच विविध प्रसारमाध्यमांतून मतदारांपर्यंत माहिती पोहोचविण्याची कार्यवाही केली जाईल. राजकीय पक्ष हे या प्रक्रियेतील महत्वाचे घटक आहेत. त्यामुळे, प्रशासनाप्रमाणेच  विविध राजकीय पक्षांनीही मतदान केंद्रांच्या सुसूत्रीकरणाबाबत मतदारांपर्यंत माहिती पोहोचवावी. जेणेकरुन व्यापक स्तरावर जनजागृती होईल, असे आवाहन जोशी यांनी केले. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad