शिवसेनेचा प्रचाराचा झंझावात, महाविजय संवाद अभियानाची घोषणा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

26 سبتمبر 2024

शिवसेनेचा प्रचाराचा झंझावात, महाविजय संवाद अभियानाची घोषणा


मुंबई - महायुती सरकारची कामे घरोघरी पोहोचवण्यासाठी शिवसेनेने ‘महाविजय संवाद’ या राज्यव्यापी दौऱ्याची आज घोषणा केली. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युवा सेना, महिला आघाडी आणि शिवसेना सोशल मीडिया या तीन विभागांकडून शुक्रवार २७ सप्टेंबर २०२४ पासून राज्यभरात हे अभियान राबवले जाणार आहे. यात प्रत्येक विधानसभा मतदार संघाचा आढावा घेऊन पक्ष संघटना मजबूत केली जाईल, अशी माहिती शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली. बाळासाहेब भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
 
खासदार डॉ. शिंदे म्हणाले की गेल्या दोन अडीच वर्षात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात सरकारने केलेली कामे प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचवण्याचा पक्षाचा प्रयत्न आहे. त्यासाठी पक्षाने ‘महाविजय संवाद’ हे आणखी एक जनसंपर्क अभियान तयार केले आहे. या अंतर्गत दररोज एका नेत्याने व उपनेत्याने एक विधानसभा मतदार संघाला भेट द्यावी. त्यातील पाच ठिकाणी जाऊन गाठीभेटी घेणे, मेळावे घेतले पाहिजेत, असे या दौऱ्याचे स्वरुप आहे. उद्या शुक्रवारपासून महाविजय संवाद अभियान सुरु होणार असून पहिला टप्पा पाच दिवसांचा असेल, असे ते म्हणाले.
 
युवा सेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांच्या नेतृत्वात उद्यापासून युवा सेनेकडून भिवंडी ग्रामीणपासून अभियानाची सुरुवात होईल. दररोज ६ विधानसभांना भेट देणार असून यात शाखा भेटी, मेळावे घेतले जातील. नवरात्रौत्सवात मुंबई आसपास विधानसभांना भेटी दिल्या जातील.१३ ऑक्टोबरपासून मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि पुढे कोकण असा युवा सेनेचा दौरा असेल, अशी माहिती पूर्वेश सरनाईक यांनी यावेळी दिली.
  
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना, लेक लाडकी योजना, मुलींना मोफत शिक्षण या योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचल्या आहेत का, याचा आढावा महिला आघाडी घेईल, असे शिवसेना नेत्या मीनाताई कांबळी यांनी सांगितले. शिवसेना लाडकी बहिण संपर्क अभियान कोकणपासून विदर्भापर्यंत एकाच दिवशी १८ विधानसभांमधून सुरु होणार असून त्याचे नेतृत्व मीनाताई कांबळी करणार आहेत. शिवसेना युवासेनेचे सरचिटणीस आणि शिवसेना सोशल मीडिया राज्य प्रमुख राहुल कनाल यांच्या नेतृत्वात शिवसेना सोशल सैनिकांकडून उद्यापासून नाशिक, नंदुरबार, धुळे, शिर्डी, नगर असा दौरा सुरु होणार आहे. 
   
खासदार डॉ. शिंदे म्हणाले की, जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि मुंबई यामधील ५० विधानसभांचा आढावा घेण्यात आला असून जनसंवाद दौऱ्याचा पुढील टप्पा लवकरच सुरु होईल, असे त्यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, गेल्या अडीच वर्षात मुंबईत काय काम केले हे विरोधकांनी सांगायला हवे. स्वत: अडीच वर्ष घरात बसले आणि इतरांना पण घरी बसवले, अशी खरमरीत टीका यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी उबाठावर केली. कोविड काळात ज्यांनी बॉडीबॅग, कोविड सेंटर आणि खिचडीसारखे घोटाळे केले त्यांना सरकारवर आरोप करण्याचा अधिकार नाही, असे खासदार डॉ. शिंदे यांनी ठणकावले. 

डॉ. शिंदे पुढे म्हणाले की, आम्ही विकासाच्या गोष्टी करतो केवळ आरोप करत नाहीत. त्यांनी कारशेडचे काम थांबवले होते आम्ही मेट्रो कारशेडचा विषय मार्गी लावला. लवकरच मेट्रो ३ लाईन सुरु होईल. कोस्टल रोडला गती दिली. एमटीएचएल सुरु केला. मुंबईला खड्डेमुक्त करण्याचे काम आमच्या सरकारने केले. त्यांनी फक्त डांबरीकरण करुन पैसे खाल्ले, असा टोला खासदार डॉ. शिंदे यांनी लगावला. मुंबईत बुधवारी  सायंकाळी कमी वेळेत प्रचंड पाऊस झाला. यावेळी एका महिलेचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना घडली. त्यासंदर्भात महापालिकेने चौकशीचे आदेश दिले असल्याचे खासदार डॉ. शिंदे म्हणाले.

ليست هناك تعليقات:

إرسال تعليق

Post Bottom Ad