मुंबई - राज्यातील सामाजिक व आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या भागांत वैद्यकीय सेवेपासून वंचित असलेल्या भागातील लोकांपर्यत आरोग्य सेवा पोहचविण्याकरीता उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राज्यभर लोकसहभागातून सामुदायिक आरोग्य शिबिरे राबविण्यात येणार असून रामेश्वर नाईक हे या शिबिर आयोजन कार्यक्रमाचे मुख्य समन्वयक आहेत. याची सुरुवात 1 सप्टेंबर 2024 पासून झाली असून मुंबईतील घाटकोपर विभागाचे आमदार राम कदम यांच्या मतदार संघात रविवारी आरोग्य शिबीर घेण्यात आले.
त्याचप्रमाणे असेच शिबीर जळगाव, चंद्रपूर जिल्हा व राज्याच्या इतर भागातही आयोजन करण्यात आले होते. या सामाजिक आरोग्य शिबिरामध्ये विविध धर्मादाय संस्था (NGOs), मेडीकल असोसिएशन, शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालये, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ व त्यांच्याशी संल्लग्नीत खाजगी वैद्यकीय महाविद्यालये व विद्यार्थी, महात्मा ज्योतिबा फुले जन – आरोग्य योजने अंतर्गत नोंदणीकृत रुग्णालये, समाजकार्य महाविद्यालयातील विद्यार्थी, लोकप्रतीनिधी यांचा सहभाग असणार आहे. त्यास नागरीकांनी उत्तम प्रतिसाद दिला असून हजारो नागरिकांनी मोफत आरोग्य शिबिराचा लाभ घेतला असल्याचे राज्यस्तरीय विशेष वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांनी सांगितले.
सामुदायिक आरोग्य शिबिरे प्रामुख्याने दलित वस्त्या, भटक्या जमातीच्या वस्त्या, आदिवासी पाडे, झोपडपट्ट्या या भागांत राबविण्यात येणार असून सर्व सुविधा मोफत मिळणार आहेत.नागरीकांचे स्क्रिनींग करणे, रक्त तपासण्या करणे. (59 प्रकारच्या रक्त चाचण्या करण्यात येणार आहेत. ई.सी.जी. तपासण्या करणे, आयुष्मान भारत योजना कार्डचे वाटप करणे (आभा कार्ड), आवश्यक औषधांचे वाटप करणे, रोगाचे निदान झाल्यास रुग्णावर शासनाच्या आरोग्य विषयक योजनाच्या माध्यमातून उपचाराकरीता समन्वय साधणे आणि शासनाच्या आरोग्य विषयक विविध योजनांची माहिती देणे असे स्वरूप या आरोग्य शिबिराचे असणार आहे.
No comments:
Post a Comment