मुंबई पूर्व उपनगरात सर्वाधिक 170 मिलिमीटर पाऊस, महिलेचा मृत्यू - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

26 September 2024

मुंबई पूर्व उपनगरात सर्वाधिक 170 मिलिमीटर पाऊस, महिलेचा मृत्यू


मुंबई - मुंबईमध्ये काल (25 सप्टेंबरला) सायंकाळपासून पावसाला सुरुवात झाली. गेल्या 24 तासात मुंबई पूर्व उपनगरात सर्वाधिक 170 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. अंधेरी सिप्स येथे नाल्यामध्ये एक महिला वाहून गेल्याने तिचा मृत्यू झाला. मुंबईत आजही अतिमुसळधार पावसाची शक्यता असल्याने शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. (Mumbai Latest News) (Rain Update)

मुंबईत कालपासून पावसाला सुरुवात झाली. सायंकाळी पावसाने जोर पकडला. सतत पडणाऱ्या पावसामुळे मुंबईत सखल भागात पाणी साचले. मुंबई शहरात 117.18, पूर्व उपनगरात 170.58, पश्चिम उपनगरात 108.75 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. मुंबईच्या अंधेरी येथील सिप्स गेट नंबर 8 येथील जलाशय इमारती समोर काल रात्री 9.20 वाजता एक महिला नाल्यात वाहून गेली. त्या महिलेला अग्निशमन दलाने बाहेर काढून कूपर रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच रात्री 11.37 वाजता त्या महिलेचा मृत्यू झाल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले. विमल अनिल गायकवाड (वय 45) असे मृत महिलेचे नाव आहे. 

सखल भागात पाणी साचल्याने अनेकांच्या घरात आणि दुकानांमध्ये पाणी शिरून नुकसान झाले. काल रात्री पडलेल्या पावसामुळे रेल्वे रुळावर पाणी साचल्याने मध्य आणि हार्बर मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतूक मंदावली होती. पावसामुळे मुंबईत अनेक सखल भागात पाणी साचले होते. साचलेल्या पाण्यामुळे बेस्टच्या 28 बसेस नादुरुस्त झाल्या. त्यात बेस्टच्या स्वतःच्या 21 तर भाडेतत्त्वावरील 7 बसचा समावेश आहे. 

मुंबईत आज 40 ते 50 किलोमिटर वेगाने वारे वाहून मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मुसळधार पावसाची शक्यता असल्याने आज शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. नागरिकांनी गरज असेल तरच घराबाहेर पडावे असे आवाहन मुंबई महापालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad