मुंबई- राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्याने त्यांचा अवमान झाला आहे. त्याच्या निषेधार्थ आज महाविकास आघाडीकडून महायुती सरकारच्या विरोधात मुंबईत हुतात्मा चौक ते गेटवे ऑफ इंडिया असा मोर्चा काढण्यात येणार आहे. यावेळी ‘सरकारला जोडे मारा‘ आंदोलन केले जाणार आहे. या आंदोलनाला अद्याप पोलिसांनी परवानगी दिलेली नाही. मात्र पोलिसांनी परवानगी दिली नसली तरीही उद्याचे आंदोलन होणारच, अशी ठाम भूमिका महाविकास आघाडीमधील नेत्यांनी घेतली आहे.
राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवरायांचा पुतळा नुकताच कोसळला. याचे पडसाद राज्यभर उमटत आहेत. पुतळा उभारताना अनुभव नसलेल्या लोकांना काम देण्यात आले. पुतळ्याचे काम मिळाले ते जयदीप आपटे ठाण्यातील आहेत. मुख्यमंत्री आणि त्यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे हे ठाण्यातील असल्याने या प्रकरणाचे ठाणे कनेक्शन तपासावे, अशी मागणी खासदार संजय राऊत आणि आघाडीतील नेत्यांनी केली आहे. सहा फुटाची परवानगी असताना 35 फूट उंच पुतळा उभारल्याने यात भ्रष्टाचार झाल्याचा आरोपही करण्यात आला असून, त्याचीही चौकशी करण्याची मागणी केली जात आहे.
या मोर्चाचे नेतृत्व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे शरद पवार, शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेसचे महाराष्ट्र अध्यक्ष नाना पटोले करणार आहेत. मोर्चात महाविकास आघाडीचे नेते, खासदार, आमदार आणि लाखो कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. हा मोर्चा आज सकाळी 10 वाजता हुतात्मा चौक येथून सुरू होऊन गेटवे ऑफ इंडिया येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याजवळ जाऊन तिथे सरकारला ‘जोडे मारा आंदोलन’ केले जाईल.
महाविकास आघाडीने आयोजित केलेल्या या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली. परवानगी द्यावी यासाठी आज शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी पोलीस उपायुक्त अभिनव देशमुख यांची भेट घेतली. त्यानंतरही मोर्चाला परवानगी देण्यात आली नाही. परवानगी नाकारण्यात आली असली तरी महाविकास आघाडीने मोर्चाची जोरदार तयारी केली आहे. अरविंद सावंत यांनी गेटवे ऑफ इंडिया येथील कार्यक्रम स्थळाची पाहणी करून आढावा घेतला. या मोर्चात कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेत म्हणून ठाकरे गटाकडून टिझर प्रसिद्ध करण्यात आला असून, त्याद्वारे शिवद्रोह्यांना माफी नाही असा संदेश सरकारला देण्यात आला आहे.
छत्रपती शिवरायांच्या अवमानाबद्दल लाखो कार्यकर्ते मोर्चात सहभागी होतील. मिंधे सरकार खरोखर मराठे आहेत का, हे तपासावे लागेल. त्यांच्या रक्तात वेगळे रसायन भरले आहे का, हे सुद्धा तपासावे लागेल. शिवरायांचा अवमान होऊनही ते गप्प कसे.
खासदार संजय राऊत
आम्ही सरकारच्या विरोधात बोलायचे नाही का? आंदोलन करायचे नाही का? इंग्रजांचे राज्य आहे का? सरकारला विचारून आंदोलने करावी लागणार आहेत का? आंदोलन करत आहोत हे पोलिसांना कळवायचे काम आम्ही केले आहे. परवानगी द्यायची की नाही हे काम पोलिसांचे आहे. आमचा मोर्चा निघणारच.
खासदार अरविंद सावंत
No comments:
Post a Comment