मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण कुटुंब भेट अभियानाचा शुभारंभ - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

10 September 2024

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण कुटुंब भेट अभियानाचा शुभारंभ


ठाणे - शिवसेनेने जाहीर केलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण कुटुंब भेट’ अभियानाचा आज मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात शुभारंभ केला. ठाण्यातील किसन नगर, जय भवानी नगरमधील लाभार्थी कुटुंबाच्या घरी जाऊन मुख्यमंत्र्यांनी लाडक्या बहिणीशी संवाद साधला. यावेळी इतर शासनाच्या  कल्याणकारी योजनांचा लाभ मिळतोय का, याची विचारपूस केली. शिवसेनेने राज्यातील दोन कोटी घरांपर्यंत पोहोचण्याचे हे महत्वकांक्षी जनसंपर्क अभियान तयार केले असून त्याची जबाबदारी युवा सेनेवर सोपवण्यात आली आहे. 

ठाण्यातील कोपरी-पाचपाखाडी मतदार संघातील १५ कुटुंबियांची मुख्यमंत्र्यांनी भेट घेतली. या अभियानातून शिवसेनेचे मंत्री, आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी आणि युवा सेनेचे कार्यकर्ते आठवडाभरात एक कोटी घरांपर्यंत पोहोचतील, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. 

मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, योजना आदेश देऊन नाही तर प्रत्यक्ष रस्त्यावर उतरुन लोकांच्या घराघरांत जाऊन त्याचे महत्व पटवून देण्यासाठी हे अभियान सुरु करण्यात आले आहे. योजनेची घोषणा होऊन महिनाभरात त्याला लाभ मिळणे हे आतापर्यंत इतिहासात कधी घडले नव्हते, असे मुख्यमंत्री म्हणाले. शासन आपल्या दारी योजनेत ५ कोटींहून अधिक नागरिकांना लाभ झाला होता. तशाच प्रकारे सरकारच्या योजनांचा सर्वांना लाभ मिळावा, यासाठी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण कुटुंब भेट’ अभियान राबवले जाईल, असे ते म्हणाले.   
 
या अभियानात मुख्य नेत्यांपासून कार्यकर्त्यांपर्यंत जवळजवळ एक लाख पदाधिकारी, कार्यकर्ते हे पुढील दोन आठवडे घरोघरी जाऊन संवाद साधणार आहेत. या अभिनायातील नोंदी ठेवण्यासाठी अ‍ॅप तयार करण्यात आले आहे. त्यातून लाभार्थींच्या अचडणी सोडण्याचा प्रयत्न असेल असे युवा सेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांनी सांगितले.    

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण कुटुंब भेट अभियानाअंतर्गत किसन नगर २ मधील रेशमा भास्कर पांडव, अर्चना पाटील, राधा रावत या बहिणींच्या घरी मुख्यमंत्री पोहोचले. यावेळी त्यांनी कुटुंबातील सदस्यांना सरकारी योजनांबाबत माहिती दिली. जय भवानी नगरमधील शीतल कालेकर सुनंदा कालगुडे, सीमा लाटणेकर, स्वाती घाडगे यांच्या घरी जाऊन मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला. सगळ्या महिला कमवत नाहीत त्यामुळे लाडकी बहिण योजनेमुळे गरजू महिलांना आर्थिक मदत होते. उशिरा अर्ज करुन देखील पैसे मिळाल्याबद्दल शीतल कालेकर यांनी शासनाचे आभार मानले. मुख्यमंत्री स्वत: घरी आले आणि विचारपूस केली खूप आनंद झाला, अशी भावना स्वाती घाडगे यांनी व्यक्त केली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad