जळगाव - अर्थ खात्यासारखे नालायक खाते पाहिले नाही, दहा वेळा फाईल निगेटिव्ह होऊन यायची. मात्र फॉलोअपमुळे आमचे काम झाले. दोन अडीच महिन्यात येणा-या विघ्नासाठी प्रयत्न करा, स्वार्थाबरोबर परमार्थ ही करावा लागतो. आमच्या कडे लक्ष ठेवण्यासाठी लोकांनाही सांगा. ते तुम्ही न सांगता ही सांगाल याचा विश्वास आहे असे शिंदेच्या शिवसेनेचे नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले.
हात पंप आणि वीज पंप दुरुस्ती आणि देखभाल कर्मचारी संघटनेच्या वतीने आज जळगावमध्ये मंत्री गुलाबराव पाटील यांच्या कृतज्ञता सोहळ्याच्या निमित्ताने जाहीर सत्कार सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. गुलाबराव पाटील म्हणाले, तुम्ही आज माझ्या सत्कार सन्मानसाठी जी शाल दिली तिची ऊब मी कधीही विसरू शकणार नाही. तुमची शाल मला कोणत्याच विरोधकांची थंडी वाजू देणार नाही. उद्धव ठाकरे सरकारमध्ये मी पाणी पुरवठा खात मागितले नव्हते. कॅबिनेटमध्ये वर्णी लागत असल्याने मी समाधानी होतो असे मतही गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केले.
पुढे बोलताना गुलाबराव पाटील म्हणाले, वडील विरोधी पक्षात काँग्रेसचा प्रचार करत होते, मी बाळासाहेब यांच्या सेनेचा प्रचार करत विजयी झालो. सरकारमधे राज्य मंत्र्याला फारसे करून घेता येत नाही, पाणी पुरवठा खाते आले आणि आमच्या लोकांना महत्त्व आले. मी देव दुत नाही, गरिबी जवळून पाहिली आहे. कष्ट करणा-यांचे पैसे खाणा-याचे हात लुळे झाल्याशिवाय राहणार नाहीत, परमेश्वराने माझ्या हातून हे काम करायचे ठरवले असेल म्हणून झाले.
मंत्र्याने कर्मचारी खुश ठेवायला पाहिजेत -
जनतेला पाणी पाजण्याचे काम करण्याचे भाग्य मला मिळाले. आयुष्यात आता लोकांसाठीच काम करायचे आहे. राजकारणात आपण बडेजाव केला नाही, पण जिथे गरज आहे तिथे मंत्री म्हणून ते केले. आमदार जर मंत्री होऊ शकतो तर डेप्युटी इंजिनिअरने वरिष्ठ अधिकारी होऊ नये का? असा सवालही पाटील यांनी केला. पुढे बोलताना पाटील म्हणाले, मंत्र्याने आपल्या डिपार्टमेंटमधील कर्मचारी खुश ठेवायला पाहिजेत, तरच चांगला काम होऊ शकतं. मी माझ्या खात्यात अनेकांना प्रमोशन दिले, माझ्या सारखा प्रमोशन देणारा दुसरा कोणी नसेल. आमची शेवटची ओव्हर आहे. निवडणुकीत हेच आशीर्वाद कामात येणार आहे. किती लोकांची कामे केली हे महत्वाचे आहे. ही शिदोरी बरकत आहे.
No comments:
Post a Comment