ठाणे - बदलापूर येथील दोन लहान मुलींवर लैंगिक अत्याचार करणारा आरोपी अक्षय शिंदे याने पोलिसांवर गोळीबार केला. त्यावेळी पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केलेल्या गोळीबारात अक्षय शिंदे याचा मृत्यू झाला आहे. अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणात आता आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. पोलिसांच्या एन्काऊंटवर विरोधकांनी शंका उपस्थित केली आहे. तर अशा प्रकारे पोलिसांच्या क्षमतेवर प्रश्न उपस्थित करणे दुर्दैवी असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. दरम्यान या प्रकरणाचे सखोल चौकशीचे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.
बदलापूर पूर्व येथील शाळेतील साडेतीन वर्षीय लहान मुलींवर 13 ऑगस्ट रोजी लैंगिक अत्याचार झाला होता. लहान मुलीने सुसूच्या जागी मुंग्या चावत आहेत असे सांगितल्यावर हा प्रकार उघड झाला. या प्रकरणी बदलापूर पोलिसांनी अक्षय शिंदे या सफाई कामगाराला 17 ऑगस्ट रोजी अटक केली होती. राज्य सरकारने या प्रकरणी एस आय टी नेमली होती. एस आय टी कडून या प्रकरणाचा तपास केला जात होता. आरोपी अक्षय अण्णा शिंदे, वय 24, पॉक्सो कायद्याखाली विविध गुन्ह्यांसाठी तळोजा मध्यवर्ती कारागृहात न्यायबंदी होता. बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यातील गुन्ह्याच्या तपासासाठी आरोपीला ट्रान्सफर वॉरंट सह ताब्यात घेतले. मुंब्रा बायपासजवळ पोलिसांच्या गाडीमध्ये आरोपीने पोलीस अधिकाऱ्याचे पिस्तुल खेचून तीन राउंड फायर केले. फायरमधून एक राउंड सपोनि निलेश मोरे यांच्या मांडीला लागला. स्वसंरक्षणार्थ पोलिसांनी प्रत्युत्तरात गोळीबार केला, ज्यात आरोपी अक्षय शिंदे जखमी झाला. जखमी अवस्थेत आरोपीला छत्रपती शिवाजी महाराज शासकीय रुग्णालयात नेले, जिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. आरोपीच्या मृतदेहाचे शवविच्छेदन जे.जे. हॉस्पिटल, मुंबई येथे केले जाणार आहे.
No comments:
Post a Comment