मुंबई - केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आपल्या महाराष्ट्र दौर्यात पदाधिकार्यांना, कार्यकर्त्यांना केलेल्या मार्गदर्शनामुळे संघटनेत ऊर्जा निर्माण झाली असून आगामी निवडणुकीत महायुतीच्या विजयासाठी पक्ष संघटना जोमाने काम करेल, असा विश्वास भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी व्यक्त केला.
भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषेदत बावनकुळे बोलत होते. प्रदेश समन्वयक विश्वास पाठक, मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन आदी यावेळी उपस्थित होते.भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते घरोघरी जाऊन सामान्य जनतेच्या मनात महाविकास आघाडीने खोट्या प्रचारामुळे निर्माण केलेला संभ्रम दूर करतील, त्याचबरोबर केंद्र, राज्य सरकारच्या कामगिरीची माहिती देतील, असेही बावनकुळे यांनी नमूद केले.
बावनकुळे यांनी सांगितले की, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी 24, 25 सप्टेंबर रोजी विदर्भ, मराठवाडा, पश्चिम व उत्तर महाराष्ट्रात संघटनात्मक बैठका घेतल्या. या दौर्यामध्ये जवळपास 5 हजार पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी शाह यांनी संवाद साधला. आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीमध्ये समन्वय असावा, महायुतीचा विजय व्हावा यासाठी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी कसे काम करावे याविषयी शाह यांनी मार्गदर्शन केले.
बूथपातळीवरच्या महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या मनात केंद्र आणि राज्य सरकार विषयी असलेले गैरसमज दूर करण्यासाठी भाजपा कार्यकर्त्यांनी प्रयत्न करण्याची सूचना शाह यांनी केली आहे. त्यादृष्टीने पक्ष कार्यकर्ते बूथपातळीवर सक्रीय होतील,पक्ष कार्यकर्त्यांनी बूथपातळीपर्यंत सामान्य जनतेशी संपर्क साधावा तसेच केंद्र आणि राज्य सरकारच्या लाभार्थ्यांचा सन्मान करणे, सरकारची चांगली कामगिरी आणि संघटनेची ताकद याच्या जोरावर राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार आणणे, यासाठी अमित शाह यांनी या संघटनात्मक बैठकांमध्ये कार्यकर्ते, पदाधिकार्यांना विजयाचा मंत्र दिला, असे बावनकुळे यांनी सांगितले. शाह यांनी प्रमुख पदाधिकार्यांना केलेल्या मागदर्शनामुळे संघटनेत उर्जा निर्माण झाली आहे. शाह यांनी संघटन शक्ती मजबूत करण्याच्या आणि डबल इंजिन सरकारची कामगिरी सामान्य माणसांपर्यंत पोहचवण्याचा दिलेल्या मूलमंत्राचे आम्ही पालन करू आणि राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार आणण्यासाठी प्रयत्न करू, असेही बावनकुळे यांनी सांगितले.
ليست هناك تعليقات:
إرسال تعليق