मुंबईतील बोगस डॉक्टरला अटक करा - भीम आर्मी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

07 September 2024

मुंबईतील बोगस डॉक्टरला अटक करा - भीम आर्मी


मुंबई - बोगस पदवीचा वापर  करून मुंबईत प्रॅक्टिस केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या डॉक्टरवर बीकेसी पोलीस ठाणे मेहरबान असून सदर प्रकरण अन्य पोलीस ठाण्यात वर्ग करून संबंधित डॉक्टरला अटक करावी, बीकेसी पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई करावी तसेच मुंबईतील बोगस डॉक्टर प्रकरणाची  सीबीआय चौकशी करावी अशी मागणी भीम आर्मी या सामाजिक संघटनेने मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि मुंबई पोलिसांकडे केली आहे. राज्य सरकारने त्वरित कारवाई न केल्यास आंदोलनाचा ईशारा संघटनेने दिला आहे.

भारतात २०१० पासून बंद झालेल्या युनिव्हर्सिटी ऑफ सेशल्स या विद्यापीठातून २०११ साली आर्थोपेडिक एमएस ही पदवी घेतल्याचे दाखवून डॉक्टर अतुल वानखेडे यांनी मुंबईच्या सेव्हन हिल्स या नामांकित रुग्णालयात दोन वर्षे सेवा दिली. ते सध्या नानावटी रुग्णालयात सेवा देत आहेत या दोन्ही रुग्णालयात त्यांनी युनिव्हर्सिटी ऑफ सेशल्ससोबत संलग्न असलेल्या के इ एम रुग्णालय, पुणे येथून आर्थोपेडिक एम एस ची पदवी घेतल्याचा उल्लेख केला होता. वास्तविक पाहता के इ एम रुग्णालय पुणे हे या विद्यापीठाशी संलग्न नसून या रुग्णालयात आर्थोपेडिक हा विषयच नसल्याचे स्पष्टीकरण के इ एम रुग्णालयाने दिले आहे. तर युनिव्हर्सिटी ऑफ सेशल्स भारतातून २०१० पासून बंद करण्यात आल्याचे या विद्यापीठाने स्पष्ट केले आहे. 

दरम्यान डॉक्टर अतुल वानखेडे यांनी केलेल्या या बोगसगिरीची  बीकेसी पोलीस ठाण्यात दिनांक ११०५-२०२४ रोजी  भा. दं. वि. ३८७/२०२४  नुसार आयपिसी ४२०,४६५,४६७,४६८ व ४७१ अन्वये गुन्हा दाखल झाला आहे. शिवाय इतरही गुन्हे यात पोलीस ठाण्यात दाखल झाले आहेत. सदरचे गुन्हे दाखल होवून तीन महिन्यांचा कालावधी उलटून गेला तरीही बीकेसी पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक विजयकुमार शिंदे आणि परिमंडळ ८ चे पोलीस उपायुक्त दीक्षित गेडाम हे आरोपीला अटक करू शकले नाहीत, असा आरोप भीम आर्मीचे राष्ट्रीय महासचिव अशोक कांबळे यांनी आपल्या तक्रारीत केला आहे.                  

सदर प्रकरण उघडकीस आणणाऱ्या अपर्णा मुखर्जी आणि त्यांचा ९ वर्षांचा मुलगा अंश यांना वानखेडे यांनी वारंवार त्रास देणे सार्वजनिक ठिकाणी मारहाण शिवीगाळ करणे आदी प्रकार केले आहेत. या मारहाणीत अंश याची वाचा गेली होती त्याला बोलता येत नव्हते यासंदर्भातील तक्रारी मुंबईतील सांताक्रुज व जुहू आदी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे मुखर्जी यांनी न्याय मिळावा म्हणून केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्याकडे धाव घेतली होती. त्यांनी मुखर्जी आणि त्यांच्या मुलाला पोलीस संरक्षण पुरविणाची मागणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली असता गृहमंत्र्यांनी ही मागणी मान्य  करून सुरक्षा पुरविण्याचे आदेश संबंधितांना दिले होते. याचा राग मनात ठेवून बीकेसी पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक व तपस अधिकारी विजयकुमार शिंदे यांनी अपर्णा वानखेडे आणि त्यांचा मुलगा अंश यांच्यासमक्ष २० जुलै २०२४ रोजी दुपारी ३ वाजता रामदास आठवले यांच्यावरून मुखर्जी यांना अपशब्द वापरले. मी एन्जॉय करीत आहे की एक दलित मंत्री या मुक्या चिमुरड्याला मदत करतोय, तुमच्या रक्षणासाठी पत्र लिहिणाऱ्याचा व तुमचा खूप जवळचा संबंध आहे असे दिसते, अशा प्रकारे बोलून या महिलेचा व मुलाचा अवमान केला. 

त्यामुळे सदर प्रकरणाचा तपास बीकेसी येथून काढून घेवून अन्य परिमंडळ येथे देवून वानखेडे यांना त्वरित अटक करावी. बीकेसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजयकुमार शिंदे यांच्याविरुद्ध कडक कारवाई करावी. वानखेडे यांच्यासारखे युनिव्हर्सिटी ऑफ सेशल्स मधून पदवी घेणारे अनेक बोगस डॉक्टर मुंबई-महाराष्ट्रात असण्याची शक्यता लक्षात घेता, सदर बोगस पदवी डॉकटर प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी अशी मागणी भीम आर्मीने केली आहे. याप्रकरणी दुर्लक्ष केल्यास आंदोलन करावे लागेल, असा ईशारा भीम आर्मीचे अशोक कांबळे यांनी दिला आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad