येवता गावातल्या जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या एका आठवर्षीय चिमुरड्यासोबत 29 ऑगस्ट रोजी हा प्रकार घडला आहे. जिल्हा परिषद शाळेजवळ किराणा दुकान चालवणाऱ्या कविता जोगदंड यांनी "चॉकलेट का चोरतोस?" असं विचारत बळजबरीने या मुलाचे हातपाय बांधून ठेवल्याचा आरोप आहे. सध्या आरोपी फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. याप्रकरणी मुलाचे वडील संतोष गायकवाड यांच्या फिर्यादीवरून अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा (अॅट्रॉसिटी) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संतोष गायकवाड यांनी सांगितलं की, झाडाला बांधून ठेवल्यावर माझा मुलगा रडायला लागला. आता रडलास तर अजून मारेन म्हणून कविता यांनी मुलाला पाठीत चापटीने मारले. माझ्या मुलाने पाणी मागितलं तर त्याला पाणीही दिलं नाही. चॉकलेट घेतल्याच्या संशयावरून माझ्या मुलाला त्यांच्या घरासमोर, सार्वजनिक ठिकाणी, अंगणात, सर्व लोकांना दिसेल अशा पद्धतीने झाडाला बांधून ठेवलं. मला जातीवाचक शिवीगाळ केली गेली. मला न्याय हवा आहे.
माजलगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. बी. धीरज कुमार यांनी सांगितले की, येवता गावात एका महिलेने लहान मुलाला बांधून ठेवल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल झालेले तिन्ही आरोपी सध्या फरार असून आम्ही एक ते दोन दिवसांमध्ये आरोपींना अटक करून पुढील चौकशी करणार आहोत. बीड जिल्ह्यातील सामाजिक सौहार्द आणि कायदा व सुव्यवस्थेसाठी आम्ही सध्या प्रयत्न करत आहोत.
याप्रकरणी केज पोलिसांनी कविता जोगदंड, पांडुरंग जोगदंड आणि गोपाळ जोगदंड यांच्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम 115(2), 351(2), 351(3), 3(5) आणि अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम 1989च्या कलम 3(1)(r), 3(1)(s) नुसार गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे भेदरलेल्या या मुलावर सध्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती आहे.
No comments:
Post a Comment