मुंबई - मुंबईच्या जलवाहिन्यांवर असलेल्या झोपड्या तोडून तेथील रहिवाशांचे माहुल येथे पुनर्वसन करण्यात आले होते. प्रदूषणामुळे येथील प्रकल्पग्रस्तांनी आपले पुनर्वसन करण्याची मागणी केली होती. अखेर गेल्या कित्तेक वर्षाची प्रतिक्षा आज संपली. दहा प्रकल्पग्रस्त नागरिकांना प्रातिनिधिक स्वरूपात एचडीआयएल, कुर्ला येथील घरांचे वाटप करण्यात आले. सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर तसेच एम पश्चिम विभागाच्या प्रभारी सहाय्यक आयुक्त अलका ससाणे यांच्या हस्ते चाव्यांचे वाटप करण्यात आले.
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्यांवर हजारो झोपडीधारक राहत होते. या झोपडीधारकांकडून जलवाहिन्यांना धोका असल्याचे कारण देत त्यांना न्यायालयाच्या आदेशाने हटवण्यात आले. हजारो झोपडीधारक घर तुटल्याने रस्त्यावर आले. त्यांना माहुलमध्ये घरे देण्यात आली. मात्र रासायनिक कंपन्यांमुळे प्रदूषण असल्याने शेकडो प्रकल्पग्रस्तांचा श्वसनाच्या आजाराने मृत्यू झाला. प्रकल्पग्रस्तांनी आपल्याला प्रदूषण नसेल अशा ठिकाणी घरे द्या या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरु केले. ऊन, पावसात आंदोलन करण्यात आले. न्यायालयातही धाव घेण्यात आली. अखेर तत्कालीन महाविकास आघाडीच्या सरकारने कुर्ला एचडीआयएलची घरे देण्याचा निर्णय घेण्यात आला.
मुंबई महापालिकेच्या एम पश्चिम विभाग कार्यालयात 1600 पैकी 569 घरांच्या वाटपाला आजपासून सुरुवात झाली. प्रदूषणाने विविध आजार आणि मृत्यू भोगलेल्या 10 कुटुंबांना प्रातिनिधिक स्वरूपात HDIL कुर्ला, येथील घरांच्या चाव्या देऊन शुभारंभ करण्यात आला. पुढच्या आठवड्यात दुसऱ्या इमारतीचा देखील ताबा घेऊन चावी वाटप होणार आहे. घरे मिळण्याची सुरवात झाल्याने कुर्ल्यातील शाळेत प्रवेश घेतलेल्या मुलांचा त्रास कमी होणार आहे, आजार भोगणाऱ्या कुटुंबांना देखील आता दिलासा मिळणार आहे. जे माहुल प्रकल्पग्रस्तांनी भोगले ते आणखी कोणाच्या वाट्याला येऊ नये, अशी प्रतिक्रिया प्रकल्पग्रस्तांनी व्यक्त केली. यावेळी घर बचाओ घर बनाओ आंदोलनाच्या समन्वयक पूनम कनौजिया, माहुल प्रकल्पग्रस्त समिती सदस्य आणि स्वाधार संस्थेच्या सुप्रियाताई देखील उपस्थित होत्या.
No comments:
Post a Comment