मुंबई - मुंबईमध्ये अकरा दिवस मोठ्या भक्तिभावाने गणेशोत्सव हा सण साजरा केला जातो. गणेशोत्सवा दरम्यान भाविक विविध ठिकाणच्या गणेशाचे दर्शन घेतात. भाविकांना गणेश दर्शन घेणे सोपे व्हावे म्हणून बेस्ट उपक्रमाने ७ ते १६ सप्टेंबर दरम्यान रात्रीच्या वेळेस २४ विशेष बस चालवण्याचे नियोजन केले आहे. त्याचा लाभ भाविकांनी घ्यावा असे आवाहन बेस्ट उपक्रमाकडून करण्यात आले आहे.
'सार्वजनिक गणेशोत्सव' हा महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा असून या उत्सवाच्या माध्यमातून भक्तीभावासह समाजप्रबोधनही करण्यात येते. विशेषतः मुंबईतील 'सार्वजनिक गणेशोत्सवाला" भक्तीभावासह सजावट बघण्याकरीता देखील भाविकांची आणि पर्यटकांची गर्दी होते. यावर्षीही ७ सप्टेंबर २०२४ ते १६ सप्टेंबर २०२४ गणेशोत्सवाच्या कालावधीमध्ये गणेश भक्ताना विविध ठिकाणी भेट देणे सोयीस्कर व्हावे या दृष्टिने बेस्ट उपक्रमाने रात्रीच्या वेळेस २४ विशेष बसगाडयांचे प्रवर्तन करण्याचे ठरविले आहे. या कालावधीत दक्षिण मुंबई परिसरातून उत्तर-पश्चिम मुंबई कडे गिरगांव, लालबाग, परळ, चेंबूर मार्गे प्रवर्तित होणा-या बसमार्ग क्र. ४ मर्या.. ७ मर्या.. ८ मर्या.. ए-२१. ए-२५. ए-४२. ४४, ६६, ६९ व सी-५१ या बसमार्गांवर रात्रीच्या विशेष बसफे-या कार्यान्वित करण्यात येणार आहेत. हे बसमार्गावर प्रवाशांच्या मागणी नुसार याबसफे-या व्यतिरिक्त अतिरिक्त बसफे-यादेखील प्रवर्तित करण्यात येतील. भाविक आणि पर्यटकांनी या विशेष बससेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन बेस्ट प्रशासनातर्फे प्रवाशांना करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment