मुंबई - मुंबईत विकत घेतलेल्या मालमत्तेच्या नोंदणीची प्रक्रिया आता अधिक सुलभ होणार आहे. राज्य सरकारच्या महसुल विभागाने मालमत्ता नोंदणीसाठी हद्दीची अट रद्द केली. यासंदर्भात शासनाने अधिसूचना जारी केली आहे. या निर्णयामुळे नागरिकांचा दस्त नोंदणी कार्यालयात येण्या-जाण्याचा वेळ वाचणार आहे.
शासनाच्या या निर्णयामुळे जर एखाद्याने मुलुंडमध्ये घर खरेदी केले आणि ती व्यक्ति अंधेरीत राहत असेल तर त्याला दस्त नोंदणीसाठी मुलुंडच्या नोंदणी कार्यालयात जाण्याची गरज भासणार नाही. त्याला दस्त नोंदणी अंधेरीच्या कार्यालयातून करता येईल. बुधवारी राज्य शासनाच्या महसूल विभागाने एक अधिसूचना जारी केली. ज्याद्वारे सर्व रजिस्ट्रेशन कार्यालयांचे एकीकरण करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. यापुढे दस्त नोंदणी कार्यालये मुंबई-फोर्ट, मुंबई - अंधेरी, मुंबई - कुर्ला अशी ओळखली जाणार नाहीत तर ती मुंबई शहर आणि मुंबई उपनगर अशी ओळखली जातील. हा निर्णय सध्या फक्त मुंबई महापालिका हद्दीसाठी घेण्यात आला आहे. मुंबईमध्ये ३२ उपनिबंधक कार्यालये आहेत. यातील २६ कार्यालये ही उपनगरात आहेत तर ६ मुंबई शहरात आहेत. या ठिकाणी मालमत्तेच्या दस्त नोंदणीसंदर्भातील कामे केली जातात.
No comments:
Post a Comment