मुंबई - बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या १५१ वा स्थापना दिवस महानगरपालिका मुख्यालयात तसेच विभागीय कार्यालयांमध्ये आज (४ सप्टेंबर २०२४ रोजी) मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विविध कार्यालयांमध्ये बृहन्मुंबई महानगरपालिका स्थापना दिनाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या अंतर्गत विलेपार्ले परिसरातील दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात आयोजित एका कार्यक्रमास सुप्रसिद्ध संतूर वादक पद्मश्री सतीश व्यास व सुप्रसिद्ध गायिका वैशाली सामंत यांची उपस्थिती होती.
वर्धापन दिनानिम्मित डॉ. रु. न. कूपर रुग्णालयात पॉक्सो कायदयातील तरतुदी आणि रुग्णालय प्रशासन, न्यायव्यवस्था आणि स्वयंसेवी संस्थांचे योगदान यावर परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. अल्पवयीन मुलांवरील लैंगिक अत्याचार याबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. शैलेश मोहिते यांनी केले होते. तसेच रूग्णालयाच्या स्त्रीरोग आणि प्रसूतिशास्त्र विभागाच्या विभाग प्रमुख डॉ. रीना वाणी यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. डॉ. रु. न. कूपर रुग्णालयातील तसेच इतर रुग्णालयातून प्राध्यापक वर्ग, वैद्यकीय अधिकारी, निवासी डॉक्टर्स, परिचारिका व परिचारीका विद्यार्थीनी व वैद्यकीय विद्यार्थी ४६४ जणांनी या परिसंवादाचा लाभ घेतला. तर 'परिमंडळ २' द्वारे विलेपार्ले परिसरातील दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात गायन, वादन व नृत्य यास समर्पित एका विशेष संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात सुप्रसिद्ध संतूर वादक पद्मश्री सुरेश व्यास, गायिका वैशाली सामंत यांची विशेष उपस्थिती होती. या कार्यक्रमात महानगरपालिकेच्या अधिकारी व कर्मचारी यांच्यासोबतच महानगरपालिका शाळांमधील विद्यार्थ्यांनी देखील आपली कला सादर केली. विशेष म्हणजे वैशाली सामंत यांनी देखील त्यांची लोकप्रिय गाणी सादर करून उपस्थित त्यांची मने जिंकली.
बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील विविध खात्यांमध्ये देखील आज सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये प्रामुख्याने जनसंपर्क विभागामार्फत खाद्य संस्कृती विषयक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महापालिकेच्या ए विभागामार्फत वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. तर दक्षिण मुंबईतील ए विभागाअंतर्गत येणाऱ्या पर्यटन स्थळांच्या ठिकाणी स्वच्छतेबाबत पर्यटकांमध्ये जनजागृती आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने करण्यात आली.
डी विभागात कचरा वर्गीकरण व पर्यावरण संतुलनाबाबत प्रबोधनात्मक फेरी काढण्यात आली. ऑगस्ट क्रांती मैदान परिसरात काढण्यात आलेल्या फेरीला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. पूर्व उपनगरांमधील एल विभागामध्ये शाळा तसेच रेल्वे स्थानक परिसरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. चांदिवली येथील पवार शाळेमध्ये स्वच्छता कार्यक्रमाचे आयोजन करत विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्व पटवून देण्यात आले. तर कुर्ला रेल्वे स्थानक आणि विभाग कार्यालयाच्या ठिकाणी स्वच्छतेचा संदेश देणाऱ्या पथनाट्याचे आयोजन करण्यात आले होते.
पश्चिम उपनगरांमध्येही विविध ठिकाणी वैविध्यपूर्ण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये प्रामुख्याने आर उत्तर विभागात स्थापना दिवसानिमित्त कचरा वर्गीकरणाबाबत जनजागृती करण्यात आली. याप्रसंगी अधिकारी, कनिष्ठ पर्यवेक्षक, मुकादम, कर्मचारी, स्वयंसेवी संस्थेचे कर्मचारी, विद्यार्थी व स्थानिक नागरिक उपस्थित होते. पी उत्तर विभागात स्वच्छतेसाठी जनजागृती करण्यासाठी प्रचारफेरी काढण्यात आली. यानुसार आज बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या विविध कार्यालयांमध्ये, रुग्णालयांमध्ये, शाळांमध्ये वैविध्यपूर्ण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
No comments:
Post a Comment