अमरावती - मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून राज्यभरातील वातावरण तापले असताना भाजप नेते अनिल बोंडे यांनी मनोज जरांगे पाटील यांना पुन्हा एकदा डिवचले आहे. मनोज जरांगे स्वत: मुख्यमंत्री झाले तरीही सग्यासोय-यांना आरक्षण मिळणार नाही. त्यामुळे कोणीही तशी वल्गना करू नये, असे बोंडे यांनी म्हटले. ते रविवारी अमरावती येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
अमरावतीत रविवारी भाजपा ओबीसी मोर्चाची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी अनिल बोंडे यांनी मनोज जरांगे पाटील यांना डिवचणारे वक्तव्य केले. त्यामुळे आता बोंडे विरुद्ध जरांगे वाद पेटण्याची शक्यता आहे. रक्ताचे नाते असलेल्या सगळ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळणारच आहे, त्यांचा ओबीसी प्रवर्गात समावेश होईल. पण सग्यासोय-यांना आरक्षण मिळणार नाही. मनोज जरांगे यांनी निवडणूक लढवली आणि ते मुख्यमंत्री झाले तरी ते ही गोष्ट साध्य करू शकणार नाहीत. कारण बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले संविधान सर्वश्रेष्ठ आहे. संविधानाचे रक्षण करण्यासाठी घटनात्मक संस्था देशात आहेत. त्यामुळे कोणीही तशा वल्गना करू नयेत, समाजात फूट पाडण्याचे काम करू नये. यात सगळ्यात जास्त नुकसान हे मराठा समाजाचे होईल, असे अनिल बोंडे यांनी सांगितले.
‘भावी मुख्यमंत्री जरांगे’ अशा आशयाचे बॅनर्स -
पुण्यातील मनोज जरांगे यांच्या शांतता रॅलीत ‘भावी मुख्यमंत्री’चे पोस्टर झळकल्याचे दिसून आले. ‘मनोज जरांगे भावी मुख्यमंत्री’ असा आशय असलेले पोस्टर मराठा बांधवांनी हाती घेतल्याचे दिसले. रॅलीदरम्यान कार्यकर्त्यांकडून पोस्टरबाजी करण्यात आली. रॅलीला सारसबाग चौकातून सुरुवात होणार आहे. यासाठी मोठ्या संख्येने मराठा बांधव उपस्थित आहेत. त्यांनी हातात भावी मुख्यमंत्री म्हणून मनोज जरांगे पाटील यांचे बॅनर घेतल्याचे दिसून आले
No comments:
Post a Comment