ठाणे/बदलापूर - बदलापूरच्या नामांकित शाळेत दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याचा प्रकार समोर आला आहे. अत्याचारपीडित चिमुरड्या अवघ्या साडेतीन ते चार वर्षांच्या आहेत. धक्कादायक अशा या प्रकारानंतर बदलापूरमध्ये संतापाची लाट असून पालक रस्त्यावर तसेच रेल्वे स्थानकात उतरून तब्बल ११ तास आंदोलन केले.
बदलापूरच्या एका नामांकित शाळेतील शिशुवर्गात शिकणा-या दोन मुलींवरील अत्याचारानंतर संतप्त पालकांचे आंदोलन लक्षात घेता प्रशासनातर्फे कारवाईला सुरुवात झाली आहे. या प्रकरणी आरोपी अटकेत असला तरी या प्रकरणी बेजबाबदारपणा दाखवणा-या एका वरिष्ठ पोलिस निरीक्षकांची तात्काळ बदली करण्यात आली आहे. तर दुसरीकडे शाळा प्रशासनाने देखील मुख्याध्यापिका, शिक्षिका आणि मुलांची ने-आण करण्याची जबाबदारी असणा-या सेविकांचे निलंबन केले आहे.
शाळेत कंत्राटी सफाई कामगाराने साडेतीन वर्षांच्या दोन चिमुकलींचे शारीरिक शोषण केल्याचा प्रकार समोर आला. या प्रकरणात अखेर ४ दिवसांनी शाळा प्रशासनाने आपली बाजू मांडत शाळेच्या मुख्याध्यापिकांना निलंबित, तर वर्गशिक्षिका आणि आया यांना थेट नोकरीवरून काढून टाकले आहे. तर आरोपी कंत्राटी सफाई कामगार ज्या कंत्राटदारामार्फत शाळेत काम करत होता. त्या कंत्राटदाराचा करारही शाळेने रद्द केला आणि सर्व पालकवर्गाची शाळेने जाहीर माफी मागितली आहे.
अत्याचाराचा हा प्रकार लक्षाता येताच पालकांनी तक्रार दाखल करण्यासाठी पोलीस ठाणे गाठले. मात्र या ठिकाणी मुलींच्या पालकांची तात्काळ तक्रार न घेता त्यांना तब्बल १२ तास ताटकळत ठेवण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या हस्तक्षेपानंतर रात्री एक वाजता पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
या घटनेचे पडसाद आज उमटले. पालकांनी सकाळीच शाळेत जाऊन ठिय्या आंदोलन केले. तर नागरिकांनी आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी या मागणीसाठी रेल्वे रोको आंदोलन केले. याचा परिणाम रेल्वे वाहतुकीवर झाला. अंबरनाथ ते कर्जत - खोपोली मार्गावरील रेल्वे सेवा बंद होती. शाळेजवळ आंदोलकांवर अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्याने रेल्वे स्टेशन परिसरातील आंदोलक आक्रमक झाले. अखेर सायंकाळी ६ वाजता पोलिसांनी लाठीचार्ज करत आंदोलकांना रेल्वे स्टेशन परिसरातून बाहेर काढले.
No comments:
Post a Comment