मुंबई - भारताचा ७८ वा स्वातंत्र्यदिन समारंभ उद्या गुरूवार १५ ऑगस्ट २०२४ रोजी साजरा करण्यात येणार आहे. स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ राज्यात एकाच वेळी सकाळी ०९.०५ वाजता आयोजित करण्यात येणार असून सकाळी ०८.३५ ते ०९.३५ या वेळेत इतर कोणताही शासकीय किंवा निमशासकीय समारंभ आयोजित करण्यात येऊ नये, अशा सूचना राजशिष्टाचार विभागामार्फत देण्यात आल्या आहेत. (Marathi News) (Independence Day 2024)
या अनुषंगाने जारी केलेल्या परिपत्रकानुसार राज्याचा मुख्य शासकीय कार्यक्रम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मंत्रालय, मुंबई येथे सकाळी ०९.०५ वाजता ध्वजारोहण करून साजरा करण्यात येईल. तर, पुणे येथे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते ध्वजारोहण होईल.
शासकीय किंवा निमशासकीय कार्यालयाव्यतिरिक्त एखाद्या कार्यालयाला अथवा संस्थेला आपला स्वत:चा ध्वजारोहण समारंभ करावयाचा असल्यास त्यांनी तो सकाळी ०८.३५ पूर्वी किंवा ०९.३५ नंतर आयोजित करावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. राष्ट्रध्वजाला सलामी देऊन राष्ट्रगीत वाजविण्यात येईल व त्यानंतर लगेचच सावधान स्थितीत येऊन राज्यगीत वाजविण्यात येईल. समारंभास उपस्थित राहणाऱ्या सर्व व्यक्तींनी राष्ट्रीय पोषाख परिधान करावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.
प्रत्येक जिल्ह्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी शासनाने जाहीर केल्याप्रमाणे संबंधित पालकमंत्री अथवा अन्य मंत्री यांच्यामार्फत ध्वजारोहण करण्यात येईल. काही अपरिहार्य कारणामुळे मंत्री उपस्थित राहू न शकल्यास, विभागीय मुख्यालयी विभागीय आयुक्त आणि जिल्हा मुख्यालयी जिल्हाधिकारी हे ध्वजारोहण करतील. दरम्यान, राष्ट्रध्वज लावण्याच्या योग्य पद्धतीबाबत शासनाकडून देण्यात आलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याची दक्षता घेण्यात यावी, असं आवाहनही राजशिष्टाचार विभागामार्फत करण्यात आलं आहे.
No comments:
Post a Comment