मुंबई – विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव ठाकरे गटाने जोरदार तयारी सुरु केली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आमदार, खासदार आणि पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. या बैठकीत विधानसभा निवडणुकीच्या कामाला लागा, आपला कोणता नेता विरोधकांच्या संपर्कात आहे याची चाचपणी करा अशा सूचना उद्धव ठाकरेंनी दिल्या.
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मातोश्री या आपल्या निवासस्थानी आमदार, खासदार आणि पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. लोकसभा निवडणुकीत ज्या चुका झाल्या असतील त्या चुका विधानसभेत होऊ नये याची काळजी घेतली गेली पाहिजे. विधानसभेत मशाल जास्तीत जास्त घरी कशी पोहोचवता येईल याची देखील चर्चा या बैठकीत झाली. १६ ऑगस्टला महाविकास आघाडीचा मेळावा होणार आहे. त्यासाठी तयारीला लागण्याचे आदेश उद्धव ठाकरेंनी नेत्यांना दिले.
उद्धव ठाकरे गटातील पदाधिकारी शिंदे गटात प्रवेश करत असल्याने उद्धव ठाकरे यांनी सावध भूमिका घेतली आहे. स्थानिक गटप्रमुखांपासून ते ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांची इत्यंभूत माहिती व हालचालींवर लक्ष ठेवा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या शिवसेनेसोबत आपला कोणता पदाधिकारी संपर्कात आहे का? याची देखील चाचपणी करा, संपर्कप्रमुखांनी गटप्रमुख आणि पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधून आढावा घ्यावा, अशा सूचना ठाकरेंनी बैठकीत दिल्या.
No comments:
Post a Comment