महाविकास आघाडीचे मूक आंदोलन - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

24 August 2024

महाविकास आघाडीचे मूक आंदोलन


मुंबई - बदलापूरच्या शाळेत शिशू वर्गात शिकणा-या दोन चिमुकल्या मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला मुंबई उच्च न्यायालयाने मज्जाव केल्यानंतर महाविकास आघाडीच्यावतीने शनिवारी राज्यभरात तोंडाला आणि हाताला काळी पट्टी बांधून मूक आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाच्या माध्यमातून आघाडीच्या नेत्यांनी राज्य सरकारला लक्ष्य करताना न्यायालयाच्या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केली.

सत्ताधा-यांनी ‘सदा आवडत्या’ लोकांना न्यायालयात पाठवून बंदला विरोध केला व नराधमांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महिलांना संरक्षण देण्यात अपयशी ठरल्याची टीका करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली. राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनीही सरकारवर तिखट शब्दांत टीका करताना महिलांवरील अत्याचाराच्या घटनांच्या विरोधात संपूर्ण ताकदीने लढण्याची शपथ सर्वांना दिली.

मुंबई उच्च न्यायालयाने आजच्या बंदला प्रतिबंध केल्यानंतर महाविकास आघाडीच्या वतीने राज्यभरात आज मूक आंदोलन करण्यात आले. शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने दादर येथे शिवसेना भवनासमोरील चौकात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या नेतृत्वात पुण्यात तर काँग्रेसच्या वतीने मुंबईसह ठाणे, नाशिक, नागपूर, अमरावती, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर येथे भर पावसात आंदोलन करण्यात आले.

शिवसेना ठाकरे गटाच्या आंदोलनात महिलांचा सहभाग लक्षणीय होता. या वेळी उपस्थित शिवसैनिकांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. उद्धव ठाकरे यांनी या वेळी बोलताना भारत बंदच्या आंदोलनाचे उदाहरण दिले. काही दिवसांपूर्वी भारत बंद आंदोलन झाले. या बंदचा परिणाम आपल्या राज्यात फारसा दिसला नाही. मात्र, इतर राज्यांत जोरदार आंदोलन होऊन रेल्वे सेवा बंद पाडण्यात आली. त्या वेळी याचिकाकर्ते कुठे गेले होते, त्यावेळी बंदला विरोध का केला नव्हता, असा सवाल ठाकरे यांनी केला.

दरम्यान, संगमनेर येथे काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, नागपूरमध्ये विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, कोल्हापूर येथे विधान परिषदचे गटनेते सतेज ऊर्फ बंटी पाटील, खासदार श्रीमंत शाहू महाराज, अमरावती येथे माजी मंत्री यशोमती ठाकूर, खासदार बळवंत वानखेडे, नाशिक येथे खासदार डॉ. शोभाताई बच्छाव तर मुंबईत अध्यक्ष वर्षा गायकवाड, आमदार भाई जगताप आदींनी आंदोलन केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad