एड्स जनजागृतीसाठी 'रेड रन मॅरेथॉन' स्पर्धा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

09 August 2024

एड्स जनजागृतीसाठी 'रेड रन मॅरेथॉन' स्पर्धा


मुंबई - ह्युमन इम्युनो डेफिसिएन्सी व्हायरस (एचआयव्ही) म्हणजेच एड्स बाबतची जनजागृती बृहन्मुंबई महानगरपालिका संचालित मुंबई जिल्हे एड्स नियंत्रण संस्थेमार्फत करण्यात येते. राष्ट्रीय एड्स नियंत्रण संघटनेच्या (नॅको) मार्गदर्शक नियमावलीनुसार मुंबईमध्ये एचआयव्ही एड्सच्या नियंत्रणासाठी ही संस्था कार्यरत आहे. या संस्थेमार्फत मुंबईत रविवार दिनांक ११ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ७ ते ११ या वेळेत 'रेड रन मॅरेथॉन' स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यंदाच्या वर्षी ‘Run to end AID’S’ या संकल्पने अंतर्गत एचआयव्ही एड्स विषयाची महाविद्यालयीन युवकांमध्ये जनजागृती करण्याकरिता या मॅरेथॉनचे आयोजन करण्यात येणार आहे.

'रेड रन मॅरेथॉन' स्पर्धेला हिरवा झेंडा दाखवण्यासाठी उपायुक्त (सार्वजनिक आरोग्य) संजय कुऱहाडे आणि मुंबई जिल्हे एड्स नियंत्रण संस्थेचे प्रकल्प संचालक विजय करंजकर यांची उपस्थिती असणार आहे. रविवार दिनांक ११ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ७ वाजता मुंबई जिल्हे एड्स नियंत्रण संस्थेच्या वडाळा स्थित कार्यालयापासून ही मॅरेथॉन सुरू होणार आहे. सर्वसामान्य नागरिकांनाही या मॅरेथॉनमध्ये सहभागी होता येईल.

राष्ट्रीय एड्स नियंत्रण संघटना (नवी दिल्ली) यांचेकडून प्राप्त मार्गदर्शक सुचनेनुसार संपूर्ण मुंबईत महाविद्यालयीन युवकांकरिता व शालेय विद्यार्थ्यांकरिता विविध स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहेत. मुंबई जिल्‍हा एड्स नियंत्रण संस्थेमार्फत युवकांमध्ये एचआयव्ही / एड्स बाबत जनजागृती करण्याकरीता पथनाट्य स्पर्धा, रिल मेकींग स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहेत. शालेय विद्यार्थ्यांकरीता एचआयव्ही / एड्स या विषयावर प्रश्नमंजुषा स्पर्धा भरवण्याचे नियोजन आहे.

मुंबई जिल्हे एड्स नियंत्रण संस्था मुंबईतील १४० महाविद्यालयांमध्ये रेड रिबन क्लब आणि राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयीन युवकांमध्ये एचआयव्ही एड्स विषयक जनजागृती करण्याचे कार्य करत आहे. तसेच बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग यांच्या मदतीने मुंबईमधील २५० महानगरपालिका माध्यमिक शाळांतील विद्यार्थ्यांकरिता किशोरवयीन शिक्षण कार्यक्रम राबवित आहे. या दोन्ही उपक्रमांमधून मुंबईमधील शाळा आणि महाविद्यालयांमध्ये युवकांच्या सहभागाने विविध जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात येत आहेत. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad