मुंबई - मुंबईत मोकळ्या जागांचा अभाव असताना मोठा संघर्ष करून प्रियदर्शनी पार्क सारखी मोकळी जागा आपण राखलेली आहे. यासाठी ॲड. सुशिबेन शाह यांचे करावे तेवढे कौतुक थोडे आहे. त्यांच्या आणि सहकाऱ्यांच्या प्रयत्नातून ही मोकळी जागा सुरक्षित राहिली आहे. प्रियदर्शनी पार्क ही अत्यंत सुंदर जागा बनली असून येणाऱ्या काळात मुंबईत येणाऱ्या पर्यटकांचे नवे आकर्षण ठरेल, असा विश्वास शालेय शिक्षण मंत्री व पालकमंत्री दीपक केसकर यांनी व्यक्त केला.
प्रियदर्शनी पार्क अँड स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे नारळ आणि बॅरिंगटोनिया अशा १०० वृक्षांचे रोपण व नव्याने सुशोभीकरण केलेल्या लहान मुलांच्या प्ले एरियाचे उद्घाटन समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी, ते बोलत होते. यावेळी बोलताना दीपक केसरकर म्हणाले की, माजी मंत्री मुरली देवरा यांच्या प्रयत्नातून सुरू झालेला प्रियदर्शनी पार्कला हेरिटेजचा दर्जा मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. मुलांसाठी चिल्ड्रन पार्क तयार करण्यासाठी निधी मंजूर करून घेण्यात आला. आता चिल्ड्रन पार्क सुरू झाले आहे. या पार्कच्या सुशोभीकरणासाठी दोन कोटीचा निधी देण्याचा ठराव झाला आहे, असेही केसरकर यांनी सांगितले.
आपल्या सर्वांच्या भावना या पार्कशी जोडलेले आहेत. तर आज प्रियदर्शनी पार्क कमिटी आणि ॲड. सुशीबेन शाह यांच्या प्रयत्नाने १०० वृक्षांची लागवड करण्यात आली. वाढते जागतिकीकरण हे आपल्यासमोर मोठं संकट ठाण मांडून उभं आहे. यासाठी जास्तीत जास्त झाडे लावणे गरजेचे आहे. झाडे लावण्याची सुरुवात आपल्या घरापासून झाली पाहिजे. आज जर आपण मोठ्या प्रमाणात झाडे लावली, तर पुढच्या पिढीला चांगला ऑक्सिजन मिळू शकेल. अमेरिका व न्यूयॉर्कच्या धर्तीवर मुंबईत लवकरच सेंट्रल पार्क उभे केले जाणार आहे, हे सेंट्रल पार्क महालक्ष्मी रेसकोर्सच्या आजूबाजूला तयार होणार आणि हे सर्व सामान्य नागरिकांसाठी खुले असणार आहे, अशी माहिती खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली.
लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वजण प्रियदर्शनी पार्कचा उपयोग करतात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आणि शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या सहयोगाने चिल्ड्रन पार्क सुरू झाले आहे. सृष्टी समोर एक मोठी समस्या म्हणजे पर्यावरणाचा ऱ्हास ही आहे. मुंबई हे कोस्टल शहर आहे. अशा शहरांना संरक्षण देणे तसेच त्यांच्या इन्फ्रास्ट्रक्चर व पर्यावरणाला मजबूत करणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे, असेही खासदार मिलिंद देवरा यांनी सांगितले.
याप्रसंगी, मलबार हिल सिटीझन फोरमचे अध्यक्ष बी. ए. देसाई, महापालिकेचे अधिकारी व आजी माजी नगरसेवक यांच्यासह आदींची उपस्थिती होती.
प्रियदर्शनी पार्क स्वच्छ व सुंदर ठेवा -
प्रियदर्शनी पार्क हे माझं दुसरं घरच आहे. आपण जसे आपले घर स्वच्छ व सुंदर ठेवतो. तसेच हे पार्क स्वच्छ व सुंदर ठेवले पाहिजे. आज आम्ही शाळेच्या मुलांना सोबत घेऊन वृक्ष लागवडीचा कार्यक्रम घेतला. यात मुलांनी आनंदाने सहभाग घेतला. तसेच मुलांना प्रियदर्शनी पार्क हे आपलं वाटावं, यासाठी आपण चिल्ड्रेन पार्क सुरू केले आहे. मुलं येथे येऊन शारिरीक हालचाली करतील, हे मुख्य उद्देश आहे.
- ॲड. सुशीबेन शाह,
- सरचिटणीस, प्रियदर्शनी उद्यान व रसिकभाई मेसवानी क्रीडा संकुल.
No comments:
Post a Comment